बंगळुरु : विप्रोचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या मार्फत 52 हजार 750 कोटी रुपयांचे शेअर दान केले आहेत. प्रेमजी यांनी जे शेअर दान केले आहेत, ते विप्रो लिमिटेडच्या एकूण शेअर्सच्या 34 टक्के आहेत. प्रेमजी हे अनेक वर्षांपासून गरीब, वंचितांच्या कल्याणासाठी दान करतात. यानंतर त्यांच्याकडून देण्यात आलेल्या देणगीची रक्कम 1 लाख 45 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यासोबतच अझीम प्रेमजी फाऊंडेशन ही सामाजिक कार्यासाठी सर्वाधिक देणगी देणारी संस्था बनली आहे. याबाबतीत प्रेमजींनी बिल गेट्स अॅण्ड मिलँडा गेट्स फाऊंडेशनलाही मागे टाकलं आहे.
बिल गेट्स अॅण्ड मिलँडा गेट्स फाऊंडेशनची गुंतवणूक मालमत्ता 40 अरब डॉलर आहे, तर फोर्ड फाऊंडेशनची 12 अरब डॉलर आहे. प्रेमजी भारताचे पहिले असे व्यक्ती आहेत, ज्यांनी बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांच्या ‘द गिव्हिंग प्लेज’ या अभियानाअंतर्गत दान करण्याचं मान्य केलं. या अभियानाअंतर्गत अब्जाधीश आपल्या संपत्तीतून कमीतकमी 50 टक्के दान करतात.
प्रेमजींनी केलेल्या दानाचे पैसे हे विप्रोमधील 34 टक्के भागीदारीतून देण्यात आली आहे. प्रेमजी कुटुंबाजवळ 74.3 टक्क्यांसाठी मत देण्याचा अधिकार असेल. ही देणगी अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या मार्फत देण्यात येईल. यामध्ये एका डॉलरचा 67 टक्के भाग हा समाजासाठी देण्यात येईल.
अझीम प्रेमजी फाऊंडेशन सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्यात मदत करते. तसेच अझीम प्रेमजी हे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अनुदानही देते. 150 संस्थाना यामुळे अनुदान मिळाले आहे. अझीम प्रेमजी फाऊंडेशन ही संस्था शिक्षण क्षेत्रासाठी काम करतात.
विप्रोमध्ये प्रेमजी कुटुंबाचे 74 टक्के शेअर्स आहेत. त्यातील 67 टक्के शेअर्समधून येणारं उत्पन्न प्रेमजी समाजसेवेसाठी, गरिबांसाठी दान करतात. या पैशातून उभारलेल्या अझीम प्रेमजी विद्यापीठात सध्या 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठाची उत्तर भारतातही एक शाखा सुरु केली जाणार आहे.
फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी हे 13 व्या क्रमाकांवर आहेत. मागील वर्षी मुकेश अंबानी 19 व्या स्थानी होते. 2018 मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर एवढी होती ती आता 50 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर अझीम प्रेमजी हे या यादीत 36 व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 22.6 अब्ज डॉलर इतकी आहे.