नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये दहशतवादी मोठ्या प्रमाणात मारण्यात आले, तर कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आला. पण नेमके किती दहशतवादी मारले याबाबतचा आकडा सांगणं कठीण आहे. पण बालाकोटमधील रहिवाशांच्या मते, त्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेत भरुन नेताना पाहिल्याचा दावा केलाय. ‘फर्स्ट पोस्ट’ने याबाबत वृत्त दिलंय.
26 फेब्रुवारीला भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर एक हजार किलो बॉम्ब टाकण्यात आले. इथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्ल्याच्या ठिकाणी 35 मृतदेह होते. काही तासातच हे सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत भरुन नेण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.
‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी काही मृतदेहांची ओळखही सांगितली. 12 जण एका अस्थायी कॅम्पमध्ये झोपले होते, त्या सर्वांचा मृत्यू झाला. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे माजी अधिकारी आणि माजी कर्मचारी होते. प्रत्यक्षदर्शींनी महत्त्वाची माहिती दिल्याचा दावा या वृत्तात करण्यात आलाय. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा माजी अधिकारीही या हल्ल्यात मारला गेला. कर्णल सलीम असं त्याचं नाव सांगितलं जातंय. याशिवाय कर्णल झरार झकरी नावाचा व्यक्ती हल्ल्यात जखमी झाला.
एका प्रत्यक्षदर्शीच्या मते, हल्ला झाल्यानंतर प्रशासनाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. काही वेळातच पाकिस्तानी आर्मीने या जागेचा ताबा घेतला. विशेष म्हणजे बालाकोटमधील पोलिसांनाही या कॅम्पजवळ जाऊ दिलं नाही. पाकिस्तानी आर्मीने मृतदेह घेऊन जात असलेल्या टीमचे मोबाईल फोनही जप्त केले होते.
आत्मघातकी हल्लेखोरांचाही खात्मा
एअर स्ट्राईकच्या कारवाईत जैश ए मोहम्मदचा प्रशिक्षक मुफ्ती मोईन याचा खात्मा झाला. मोईन हा पेशावरला राहत होता. त्याचा साथीदार आणि बॉम्ब हल्ल्याचा एक्स्पर्ट उस्मान गनी भारताच्या हल्ल्यात मारला गेला. एकाच वेळी सर्वात जास्त जण मारले गेले, ते 12 जण होते. दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षणाची यांच्याकडे जबाबदारी होती. हे सर्व जण एक झोपडी तयार करुन राहत होते आणि आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण देत होते. भारतीय वायूसेनेच्या एकाच बॉम्बमध्ये या सर्वांचा खात्मा झाला.
‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी मीडिया आणि इतर काही वृत्तांमध्ये नुकसान झालं नसल्याचा दावा केला जातोय. पण यामागचं वास्तव जाणून घेण्यासाठी काही वृत्तसंस्थांनी स्थानिकांशी संपर्क साधला. अनेक पत्रकारांना हल्ल्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आलं. काही वृत्तांनुसार स्थानिक लोक किरकोळ जखमी झाले आहेत.
‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तानुसार, भारतीय गुप्तचर संस्था रॉने जैश ए मोहम्मदच्या ठिकाणांची अचूक माहिती दिली होती. पण पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदचे काही दहशतवादी एलओसीपासून दूर असलेल्या गावात राहण्यासाठी गेले होते. कारण, भारताकडून कारवाई होऊ शकते, असा त्यांना अंदाज होता. रॉच्या एका अधिकाऱ्याच्या मते, किती दहशतवादी मारले गेले याबाबत नेमकी माहिती सांगणं कठीण आहे. पण भारताने आपल्या टार्गेटवर बॉम्ब टाकलेत आणि यात जैशचं नुकसान झालंय. एअर स्ट्राईकचा हेतू साध्य झाल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
भारतीय वायूसेनेतील अधिकाऱ्यांच्या मते, रडारमध्ये जे फोटो समोर आले आहेत, त्यानुसार बालाकोटमध्ये जैशच्या दहशतवादी तळासह चार इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तर भारताच्या एअर स्ट्राईकमुळे फक्त झाडांचं नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय.