मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे (Balasaheb Thorat on Uddhav Thackeray as Popular CM). यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आलेले असतानाही यशस्वीपणे सरकारचं नेतृत्व केल्याचंही नमूद केलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होणे ही आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी नेतृत्व कसं करावं हे दाखवून दिलं आहे. हे सरकार तीन पक्षांचं आहे. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचं उत्तम नेतृत्व करत आहेत. हे महाविकास आघाडीचं सरकार सर्व सामान्य व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करणारं आहे. वेगवेगळी विचारधारा एकत्र आलेल्या आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचं यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत.”
आयएनएस आणि सी-व्होटर्सने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर सर्व्हे केला. या लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्याचं नेतृत्व प्रगल्भ आहे. या सर्व्हेतून हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचं काम करताना जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. विशेष म्हणजे या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही. यावरुन भाजपच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या राज्यातील परिस्थिती काय आहे हे स्पष्ट होते. उद्धव ठाकरेंचं काम बोलत आहे. त्यामुळेच जनतेत लोकप्रिय मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा निर्माण होते आहे.”
दरम्यान, “लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे” असं म्हणत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन: pic.twitter.com/cgSARFVC65
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 4, 2020
‘आयएएनएस’ आणि ‘सीव्होटर्स’ संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के इतकी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तर गेली सलग वीस वर्षे ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
आयएएनएस आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातील टॉप 5 मुख्यमंत्री
1. नवीन पटनायक (ओदिशा) – 82.96 टक्के
2. भूपेश बघेल (छत्तीसगड) – 81.06 टक्के
3. पिनराई विजयन (केरळ) – 80.28 टक्के
4. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) – 78.52 टक्के
5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) – 76.52 टक्के
संबंधित बातम्या :
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Balasaheb Thorat on Uddhav Thackeray as Popular CM