बीड : लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed Acid Attack) घडली आहे. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला (Beed Acid Attack).
नेमकं काय घडलं?
पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी ही घटना घडली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज (15 नोव्हेंबर) तिचा मृत्यू झाला.
मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून ती पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती.
देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील पीडितेचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, गावातच असलेल्या अविनाश राजूरे या तरुणावर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ राहण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघांनीही गावातून पलायन करुन पुणे गाठले. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.
अविनाशला दुसरे लग्न करण्यासाठी घरातील मंडळीने घाट घातला होता. त्यामुळे अविनाशने गावाकडं जाण्यासाठी पीडितेला सोबत घेतले. दोघेही पुण्यावरुन दुचाकीवर गावाकडे निघाले. बीडजवळ येताच अविनाशने तिच्या अंगावर अॅसिड फेकले आणि तिथून पसार झाला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले (Beed Acid Attack).
जखमी पीडितेला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. अविनाशला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी एक पथक रवाना केलं आहे.
नियोजित कट?
अविनाश आणि पीडिता पुण्याहून निघाल्यानंतर रस्त्यास अॅसिड कुठून मिळाले, हा मोठा प्रश्न आहे. अविनाशने पीडितेचा खून करण्याच्याच उद्देशाने गावाकडे जाण्याचा कट केला होता का?, असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.
“काल दिवाळीच्या दिवशीचं बीडमध्ये माँ जिजाऊच्या लेकीवर ॲसिड हल्ला झाला. तब्बल 12 तास रस्त्याच्या कडेला ती तडफडत होती, महिला सुरक्षेला कोणी वाली आहे की नाही, की फक्त भाषण घोषणा व संवादातचं सगळं विरलयं.. या घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणार्या घटना कुठे गेले पुरस्कर्ते”, असं ट्वीट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला.
काल दिवाळीच्या दिवशीचं बीड मध्ये माँ जिजाऊच्या लेकीवर ॲसिड हल्ला झाला तब्बल १२ तास रस्त्याच्या कडेला ती तडफडत होती
महिला सुरक्षेला कोणी वाली आहे कि नाही कि फक्त भाषण घोषणा व संवादातचं सगळं विरलयं..
या घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणार्या घटना
कुठे गेले पुरस्कर्ते…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 15, 2020
Beed Acid Attack
संबंधित बातम्या :
कल्याणमध्ये दोन गटांत हाणामारीदरम्यान अॅसिड हल्ला, सहाजण गंभीर जखमी
महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या, मुख्यमंत्र्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप
ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यानंतर नराधमाच्या मुसक्या आवळल्या