बीड: परतीच्या पावसानं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. बीड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. सोयाबीन, कापूस, तूर, ऊस अशा अनेक पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बांधावर जात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाचा आढावा मुंडे यांनी घेतला. ( Dhananjay Munde on field for inspection of damage)
अतिवृष्टीमुळं खरिप पिकाचं आतोनात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांचं काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. अनेकांच्या सोयाबीनला बुरशी लागली. पांढरं सोनं म्हणवणारा कापूसही भिजला. तर शेकडो हेक्टर फडावरील उभा ऊस आडवा झाला. त्यामुळं खरिपाच्या पिकावर पाहिलेली स्वप्नही मातीमोल झाली. अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अनेक मंत्री, विरोधी पक्षातील नेते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर अशा गावांमध्ये मुंडे यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करु असा शब्दही धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला. विरोधी पक्षनेत्यांना बिहार निवडणुकीपुढे इथलं दु:ख दिसत नाही. मात्र, सत्ताधारी पक्षातील सर्वच नेते शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जात आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी फडणवीसांवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची त्यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. पवारांनीही महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा शब्द इथल्या शेतकऱ्यांना दिला. दरम्यान, शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे आपण राज्यातील खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं पवारांनी सास्तूरमध्ये सांगितलं. केंद्र सरकारलाही मदतीसाठी विनंती करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सोमवारपासून सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.
ऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड, शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला मर्यादा, मदतनिधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार
Dhananjay Munde on field for inspection of damage