बीड : होळी आणि धुलिवंदनाच्या अनोख्या परंपरा राज्यभर पाहायला मिळतात. बीडमधील विडा (Beed Donkey procession) या गावात जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 82 वर्षांपासून सुरु आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुलिवंदन साजरा करण्यात येतो. मात्र विडा गावातील प्रथा हटके (Beed Donkey procession) अशीच आहे. या गावातील जावयाला चक्क गाढवावर बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. लग्नात घोड्यावरुन येणारे हे जावई होळीत मात्र गाढवावर बसलेले दिसतात. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
साडे सात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जाते. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसविण्याची तयारी करण्यात येते.
यंदा मात्र अनेक तरूण जावई पोबारा केल्यानं मस्साजोग येथील जावई दत्तात्रय गायकवाड यांना गाठण्यात आलं. त्यांची गाढवावर बसण्याकरीता वर्णी लागली. जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजात काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर दिला जातो.
एकदा गाढवावर बसविण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसविण्यात येत नाही. सासरच्या मंडळीकडून अपेक्षा करीत रुसवा फुगवा करणारे जावई धुलिवंदनाला गपचूप गाढवावर बसतात. धुलिवंदनाच्या या आनंदात गावकऱ्यांसह ते सुद्धा सहभागी होतात. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशातले एकमेव आहे.