बीड : महिला पोलीस सहकर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली (Beed Police Suicide). आधी प्रेमसंबंध आणि नंतर ब्लॅकमेलिंग यातून हा प्रकार घडला असल्याचं तपासात उघड झालं. दिलीप केंद्रे असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे. दिलीप केंद्रे यांनी मंगळवारी (17 डिसेंबर) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली (Beed Police Suicide).
जळगाव येथे नौकारीवर तैनात असलेल्या एक महिला पोलीस आणि दिलीप केंद्रे या दोघांत प्रेमसंबंध होते. मात्र, दिलीप केंद्रे यांची बीडला बदली झाल्याने संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ लागले. या जाचाला कंटाळून दिलीप केंद्रे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येनंतर दिलीप केंद्रे यांच्या खिशात दोन पानांची सुसाईड नोट मिळाली. यानंतर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा वर्षांपूर्वी दिलीप केंद्रे हा तरुण जळगाव जिल्ह्यात पोलीस दलात रुजू झाला. त्याचवेळी एका सहकारी महिला पोलिसासोबत त्याचे प्रेम जुळलं. पाच वर्षांनंतर दिलीप केंद्रे यांची बदली जळगावातून बीडला झाली. त्यानंतर या दोघांत एकमेकांना भेटण्यावरुन कुरबूर सुरु झाली.
गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित महिला कर्मचारी आणि दिलीप केंद्रे यांच्यात वाद सुरु होता. यानंतर संबंधित महिलेने तिच्या एका अन्य मित्राच्या सहाय्याने दिलीप केंद्रे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून दिलीप केंद्रे यांनी त्यांच्याजवळील बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे. दिलीप यांच्याजवळ सापडलेल्या चिट्ठीवरुन त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. याप्रकरणी दोघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.