बीड: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे. या घोटाळ्या प्रकरणात अजून दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 4 डिसेंबरला ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. (2 more officers suspended in Jalyukta shivar scam)
निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये अंबाजोगाई आणि बीड उपविभागीत कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ आणइ तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर यांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार घोटाळ्यात आतापर्यंत 32 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 167 गुत्तेदार मजूर संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडून वसुलीही करण्यात येणार आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे जलसंपदा खातं असताना बीड जिल्ह्यात ही योजना जोरकसपणे राबवण्यात आली. मात्र या कामांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 883 कामांपैकी 307 कामं तपासण्यात आली. त्यात 8 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं.
जलयुक्तच्या कामांच्या घोटाळ्याची चौकशी केल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत 41 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. पहिल्या टप्प्यात ही वसुली होणार असून हा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभाग आणि विधिमंडळातील महालेखा विभागामार्फत ऑडिट करण्याची मागणी वसंत मुंडे यांनी केली. त्यानंतर सरकारने एक समिती नेमली आणि 4 डिसेंबरला दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
परळी तालुका आणि जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी दबाव टाकत आहेत. त्यामुळे या प्रकरणात गुन्हे दाखल होण्यास वेळ लागत असल्याचा आरोप वसंत मुंडे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
जलयुक्त शिवार योजना फसवी, भ्रष्ट आणि निकृष्ट, ‘द युनिक फाऊंडेशन’चा अहवाल
बीडमध्ये ‘जलयुक्त शिवार’चा पर्दाफाश, 4 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप
Two more officers suspended in Jalyukta shivar scam