पालघर : आंतरराष्ट्रीय पैलवान बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडलेला एक तरुण सहा वर्षांनी घरी परतला आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरी येथील गणेश ढाके हा तरुण मंगळवारी तब्बल सहा वर्षांनी आपल्या घरी परतला. सहा वर्षांपूर्वी आपलं आंतरराष्ट्रीय पैलवान बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गणेश घरातून बाहेर पडला. तो घरातून हरियाणाकडे जाण्याकरिता निघाला होता. अनेक दिवस झाले, मात्र गणेश घरी परतला नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. पण गणेशचा कुठेही थांग पत्ता लागला नाही. चार वर्ष उलटूनही तो घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी तो कधी घरी परत येईल याची आशाही सोडून दिली होती. मात्र मंगळवारी गणेश आपल्या घरी परतला.
पालघर येथे एक हेमलता वडापावचे दुकान आहे. या दुकानात मळकट कपडे घातलेला, वाढलेले केस, वाढलेली दाढी असलेला 30-32 वर्षीय तरुण आला आणि म्हणाला की, मला भूक लागलीय, मला वडापाव द्या, पण माझ्याकडे पैसे नाहीत. हेमलता वडापाव दुकानाचे मालक आणि मनसेचे कार्यकर्ते तुळशी जोशी यांनी त्या तरुणाला वडापाव खायला दिला. त्यानंतर त्याची चौकशी केली.
त्या तरुणाच्या बोलण्यावरुन तो वेडा असेल असं वाटत नव्हतं, त्यामुळे तुळशी यांनी त्याचा पत्ता विचारला, त्याच्याजवळील मतदान कार्ड तपासलं. यावरुन तो बीडचा राहाणारा असल्याचं कळाले. यानंतर तुळशी जोशी यांनी बीडचे मनसे कार्यकर्ते अभिषेक गोल्हार यांना संपर्क केला आणि त्या तरुणाचा फोटो आणि मतदान कार्डचा फोटो पाठवला. यानंतर हा तरुण बीड येथील गणेश ढाके असल्याचं समोर आलं. मनसे कार्यकर्ते अभिषेक गोल्हार यांनी गणेश सापडल्याची बातमी गणेशच्या कुटुंबीयांना दिली.
तुळशी जोशी यांनी गणेशला सलूनमध्ये नेऊन त्याचे केस कापले, दाढी केली, त्याला नवीन कपडे दिले आणि त्यानंतर त्याला पालघर पोलिसांकडे सोपवले. पालघर पोलिसांनी गणेशला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले. गणेशला सहा वर्षांनी घरी परतलेला बघून त्याच्या कुटुंबीयांना सुखद धक्का बसला आहे.