नागपूर : बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकवायला हवेत, असं तर्कट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लढवलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गुरुवारी बोलताना त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवण्याचा सल्ला कोश्यारींनी (Bhagatsingh Koshyari Suggestion to prevent Rape) दिला.
राज्यपाल आपल्या भाषणात मुलांना चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक समजवून सांगत होते. हे लोक आपलं ज्ञान, शक्ती आणि पैशाचा कसा वापर किंवा गैरवापर करतात, याविषयी कोश्यारी बोलत होते.
‘एक काळ असा होता की घराघरात मुलींची पूजा केली जात असे. तुम्ही सर्वजण धार्मिक आहात आणि घरी देवाची उपासना करत असाल, पण आता देशात काय होत आहे? दुर्जन लोक महिलांवर बलात्कार करतात आणि त्यांना जीवे मारतात. पॉवर म्हणजे एखाद्याला घाबरवणे, धमकावणे किंवा त्यांचं संरक्षण करणं? म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवावेत, जेणेकरुन अशा घटना घडू नयेत.’ असं कोश्यारी म्हणाले.
भगतसिंग कोश्यारी विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी 10 कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे. राहुल बजाज स्वतः या कार्यक्रमात उपस्थित होते. (Bhagatsingh Koshyari Suggestion to prevent Rape)
कोण आहेत भगत सिंग कोश्यारी?
भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे.
केंद्राची ‘होशियारी’, भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरुन हटवण्याची चिन्हं
उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते.
77 वर्षीय भगत सिंग कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.
Bhagatsingh Koshyari Suggestion to prevent Rape