ठाणे : प्रियकरच्या मदतीने पळून जाऊन लग्न करण्यासाठी, तरुणीने स्वत:च्याच घरातच तब्बल 13 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. (Bhiwandi Doctor girls theft in own house)
भिवंडीतील कामतघर येथील अष्टविनायक या इमारतीच्या फ्लॅटमध्ये, बनावट चावीच्या सहाय्याने दरवाजा उघडून 13 लाख 21 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी 22 जुलै रोजी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन, संबंधित घरमालकाची मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मुलीला घरातूनच तर प्रियकराला धुळ्यातून ताब्यात घेतलं.
लॉकडाऊन काळात बहुसंख्य कुटुंबीय घरातच आहेत. मात्र तरीही या इमारतीत दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने पोलिसांना आश्चर्य वाटत होतं. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने लॅच लॉक उघडून ही चोरी केली होती. मात्र यामध्ये घरातील अथवा माहितीतील जवळच्या व्यक्तीचा समावेश असणार, असा संशय पोलिसांना होताच.
पोलिसांनी मोबाईल तपासून कॉल रेकॉर्ड चेक केल्यानंतर, मुलीने तिच्या प्रियकराशी सतत कॉल केल्याचं समोर आलं. त्यानंतर अधित तपास केला असता, ही माहिती समोर आली.
सोने चोरीला गेलेल्या कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी बीएचएमसचं शिक्षण घेत आहे. तिचं धुळ्यातील एका युवकासोबत प्रेमसंबंध जुळलं. त्या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. भविष्यातील आर्थिक चणचणीचा अंदाज घेऊन, संबंधित तरुणीने तिच्या प्रियकराला घराजवळ बोलावून घेतलं. त्यानंतर दोघांनी घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम देऊन, त्याला पसार केलं.
दागिने-पैसे चोरीला गेल्याने, कुटुंबियांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला धुळ्यातून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 55 हजार रोख आणि 8 लाख 96 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले.
(Bhiwandi Doctor girls theft in own house)