जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

| Updated on: Jul 03, 2019 | 6:03 PM

भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहू लागलंय.

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर
Follow us on

जालना : कोकणातील धरणफुटीची घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्यातही चिंता वाढवणारा प्रकार समोर आलाय. भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहू लागलंय. भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना हलवण्यात येत आहे.

धरण क्षेत्रातील सांडव्यामध्येच 2 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. भिंतीला असलेली मोठ्या प्रमाणातील गळती पाहता, जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याशी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचं मत जाणून घेऊन धामणा धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे NDRF च्या टीमला आणि औरंगाबाद येथील आर्मीच्या टीमला ही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या सर्व घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याचं जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. या धरणाचं बांधकाम अत्यंत जुनं असल्याने गळती होत असल्याचा अंदाज आहे. धरण क्षेत्रातील रहिवाशांना स्थानिक सरपंचांच्या माध्यमातून सतर्क करण्यात आलंय. स्थानिकांना लागेल ती सर्व मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असंही दानवेंनी म्हटलंय.

कोकणात तिवरे धरण फुटलं

कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटलं. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जण वाहून नेले. सकाळी पावणे 10 पर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले होते, तर बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेतला जात होता. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली.