लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणात बीआरएसला झटका, माजी उपमुख्यमंत्री यांचा मुलीसह काँग्रेसमध्ये प्रवेश

| Updated on: Apr 01, 2024 | 8:01 PM

काव्या श्रीहरी यांनी पक्षातील नेत्यांकडून आपल्याला पाठिंबा मिळत नसल्याचा दावा करत राजीनामा दिला. तसेच, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाला अनेक जागांवर पराभवाला सामोरे जावे लागेल असे भाकीतही वर्तविले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणात बीआरएसला झटका, माजी उपमुख्यमंत्री यांचा मुलीसह काँग्रेसमध्ये प्रवेश
telagana dcm kadiyam shrihari
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

तेलंगणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कदियम श्रीहरी यांनी मुलगी काव्या हिच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी आमदार बी मोहन रेड्डी यांनीही काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसच्या तेलंगण प्रभारी दीपा दासमुन्शी यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिकपणे काँग्रेसचे सदस्य घेतले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीहरी यांनी बीआरएसच्या तिकिटावर स्टेशन घणपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर, त्यांची मुलगी काव्या हिला आगामी लोकसभा निवडणुकीत वारंगल मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. परंतु, काव्या यांनी बीआरएसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

माजी उपमुख्यमंत्री श्रीहरी यांनी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. घणपूर या विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अविभाजित आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी टीडीपीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंचन, शिक्षण, समाजकल्याण आणि विपणन यांसारखी खाती सांभाळली आहेत.

वारंगलमधून निवडणूक जिंकली

2013 मध्ये श्रीहरी BRS (तत्कालीन TRS) मध्ये सामील झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वारंगल मतदारसंघातून विजय संपादन केला. मात्र, स्वतंत्र तेलंगणातील पहिली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.

दीपा दासमुन्शी यांनी घेतली होती भेट

कॉंग्रेस प्रभारी दीपा दासमुन्शी आणि कॉंग्रेसचे सचिव रोहित चौधरी, विष्णू नाथ यांनी काही दिवसांपूर्वी श्रीहरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत काँग्रेस पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी त्यांनी समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे म्हटले होते.

याआधी खासदार के. केशवराव यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएसला राम राम केला होता. त्यावेळी श्रीहरी यांनी, ‘विविध कारणांमुळे पक्षाचा पराभव होत आहे. लोक बीआरएसपासून दूर जात आहेत. जनतेची आणि मतदारसंघाची सेवा करण्यासाठी, काही तरी करायचे आहे, असे म्हणाले होते.

BRS पक्षाने वारंगल लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पसुनुरी दयाकर यांचे तिकीट कापले. त्यांच्या जागी काव्या यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे संतापलेल्या दयाकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, आता त्यांच्या पाठोपाठ उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या काव्या श्रीहरी यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना काव्या यांनी केसीआर यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार, अतिक्रमण, फोन टॅपिंग आणि दारू घोटाळ्याच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. जिल्ह्यातील बीआरएस नेत्यांमध्ये समन्वय आणि सहकार्य नाही. त्यामुळे पक्षाचे अधिक नुकसान झाले आहे असे म्हटले आहे.