शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का?, मोठा नेता भाजपच्या वाटेवर; ‘त्या’ नेत्याचा खुलासा काय?

| Updated on: Feb 13, 2024 | 1:16 PM

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर आहेत. त्यावर भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्यांच्याकडे कोणी राहिले नाही. जे आहेत ते आमच्याकडे पळत येत आहेत. त्यांना संघटना वाढवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. त्यांचे काम ते करत आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याशी त्यांची तुलना करण्याची गरज नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का?, मोठा नेता भाजपच्या वाटेवर; त्या नेत्याचा खुलासा काय?
Follow us on

जळगाव | 13 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकीय भूकंपाने काँग्रेस हादरलेला असतानाच आता शरद पवार यांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचा एक मोठा नेता भाजपमध्ये येणार आहे. भाजपच्या एका बड्या मंत्र्यानेच तसा दावा केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, ज्या नेत्याबाबत चर्चा सुरू आहे, त्याने या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना हा दावा केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी खडसे यांचे खूप निरोप येत आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे फार जोर लावून प्रयत्न चालले आहेत. असं मला कळतंय. त्याबाबत मला दिल्ली आणि राज्याकडूनही कळतंय. मात्र, मला याबाबत काहीच विचारणा झालेली नाही. तसे प्रयोजनही दिसत नाही. खडसे यांना घ्यायचं की नाही याबाबत मला विचारण्यात आलेलं नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. पण वर जर त्यांची काही लाईन असेल… हॉट लाईन असेल तर ती त्यांनी लावावी. वरून सिग्नल मिळाला तर चांगलंच आहे, असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे खडसे हे शरद पवार यांना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

खडसे काय म्हणाले ?

भाजपात प्रवेश करणार या केवळ अफवाच आहेत. माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने अफवा पसरवल्या जात आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून हा खुलासा केला आहे.

 

अमित शाह परवा जळगाव, संभाजीनगर, अकोल्यात

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जळगाव दौऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. अमित शाह 15 फेब्रुवारी रोजी अकोला, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये येत आहेत. अमित शाह हे जळगावमधील युवा संमेलनात विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधणार आहेत. तसेच जळगावमध्ये त्यांची जाहीर सभाही होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. यावेळी कोणताही पक्षप्रवेश असणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या एक दोन दिवसात मुंबई किंवा जळगावमध्ये रावेरचे श्रीराम पाटील यांचा प्रवेश होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जिभेला हाड नाही

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाढीवरून केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. राऊत यांच्या जिभेला हाड नाही. ते कुणाला काहीही बोलतात. दाढीवाले रावण म्हणताहेत, त्यांनी बोलताना विचार करावा आणि मगच बोलावं. राऊत यांनी काहीही बोलू नये, असं महाजन म्हणाले.