पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असलं तरी नितीश कुमार यांच्या JDUला भाजपपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत NDAची सत्ता आली तर नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील, असं भाजप नेत्यांकडून आवर्जुन सांगण्यात येत आहे. (Even if BJP gets more seats in Bihar, Nitish Kumar will be the Chief Minister, Clear from BJP leaders)
महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. हा मोठा अनुभव गाठीशी असलेले भाजप नेते बिहारमध्ये धोका पत्करणार नाहीत. बिहारमध्ये भाजप जरी मोठा भाऊ ठरला तरी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल, असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करत आहेत.
विरोधकांकडून मात्र या मुद्द्यावर भाजपला डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजप हा विश्वासघाती पक्ष आहे. बिहार निवडणूक निकालानंतर भाजपच्या जागा JDU पेक्षा जास्त आल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप आडकाठी करेल, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर महाराष्ट्रातील भाजप नेते आणि पक्षाच्या प्रवक्त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत, बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट केलं आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही अर्थात NDA आघाडीचा विजय झाला आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच असतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी ही माहिती दिली होती. तसंच पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला योग्य जागा देण्याची तयारी दाखवली होती. पण त्यांनी NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचं मतही शाहांनी व्यक्त केलं.
भाजप मित्रपक्षांचा फक्त वापर करतो. उद्या मोठा भाऊ ठरुनही भाजपनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं तरी ते मुख्यमंत्रीपद 5 वर्षे नसेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश काकडे यांनी केली आहे. मित्रपक्षाची साथ घेऊन भाजप स्वत: मोठा होतो. पण शेवटी मित्रपक्षांसोबत दगा करतो, असा आरोप काकडे यांनी केला आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल अद्याप हाती आलेला नाही. त्यामुळे बिहारमध्ये सत्ता कुणाची येणार? आणि मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्यास कोण होणार मुख्यमंत्री? अमित शाहांनी केलं स्पष्ट
“बिहारच्या जनतेने लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे गुंडाराज नाकारले”, अनिल बोंडेची टीका
Even if BJP gets more seats in Bihar, Nitish Kumar will be the Chief Minister, Clear from BJP leaders