ईव्हीएम नव्हे या तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा

| Updated on: Nov 04, 2020 | 5:19 PM

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. | Rahul Gandhi

ईव्हीएम नव्हे या तर मोदी व्होटिंग मशिन्स; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा
Follow us on

पाटणा: मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांना ‘ईव्हीएम’ नव्हे तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’ (MVM) म्हणायला हवे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. मात्र, यंदा बिहारच्या निवडणुकीत या MVM मशिन्सचाही फायदा होणार नाही. कारण, बिहारमधील जनता सरकारच्या कारभारावर संतप्त आहे. त्यामुळे आता ही MVM मशिन्सही महाआघाडीचा विजय रोखू शकत नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi and CM Nitish Kumar)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यानंतर आता बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी सीमांचल प्रदेशातील अररिया येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले. नितीश कुमार यांनी रोजगारनिर्मितीचे आमिष दाखवून बिहारमधील जनतेची दिशाभूल केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.


यंदा नितीश कुमार जिथे जिथे प्रचारासाठी जात आहेत, तेथील तरुण त्यांना रोजगार कुठे गेले, असा सवाल विचारत आहेत. त्यावर नितीश कुमार या तरुणांना धमकावत आहेत, त्यांना मारत आहेत. तसेच मला तुमच्या मतांची गरज नाही, असेही म्हणत आहेत. नितीश कुमार यांचे हे उत्तर कुणा एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर सर्वांसाठी आहे. ते बिहारमधील प्रत्येक तरुणाला सांगत आहेत की, मला तुमच्या मताची गरज नाही. त्यामुळे आता बिहारमधील तरुणवर्ग नितीश कुमार यांना मतदान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी महाआघाडीचे सरकार सर्वसमावेशक असेल, असा दावाही केला. हे सरकार गरीब, शेतकरी, प्रत्येक जातीचे, धर्माचे आणि प्रत्येक जिल्ह्याचे असेल. आपण सर्वजण मिळून बिहारचा कायापालट करु, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

तेजस्वी यादवांचे टीकाकार 10 तारखेला ‘खामोश’ होणार, शत्रुघ्न सिन्हांची फटकेबाजी

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी

(Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi and CM Nitish Kumar)