नागपूर| 3 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा कौल नाही, त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही. पण नजनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल असा इशारा माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समाचार घेतला आहे. हे ( विरोधक) जिंकले तर ईव्हीएम चांगली असते, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असं धोरण आहे यांचं. आता त्यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केलं आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
फडणवीसांचा एकच सवाल
माझा, या ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा ? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं काही करू शकलेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी केली होती टीका
माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात टीका केली. आज शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारववर कडाडून हल्ला चढवला. EVM च्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. जनतेचा या सरकारला कौल नाही. जनता या सरकारच्या पाठिशी नाहीये, त्यामुळे हे सरकार ही निवडणूक काही जिंकणार नाही, असं ते म्हणाले. पण तरीही जनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. याच मुद्यावरून आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे.