भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, चारित्र्याच्या संशयातून पतीनेच संपवलं

| Updated on: Feb 10, 2020 | 2:19 PM

हरियाणातील भाजप नेत्या मुनेश गोदारा यांचे परपुरुषाशी संबंध असल्याचा पती सुनीलला संशय होता. या विषयावरुन दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे.

भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, चारित्र्याच्या संशयातून पतीनेच संपवलं
Follow us on

गुरुग्राम : हरियाणामध्ये भाजपच्या महिला नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणा भाजपच्या किसान मोर्चाच्या राज्य सचिव मुनेश गोदारा (BJP Leader Munesh Godara Murder) यांची पतीने हत्या केली. मुनेश यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पती सुनील गोदाराला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय मुनेश यांच्या चारित्र्यावर पती सुनील गोदाराला संशय होता. आरोपी दादरी येथील रहिवासी असून गुरुग्रामच्या सेक्टर 93 मध्ये तो पत्नी आणि मुलीसह भाड्यावर घर घेऊन राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचा सुनीलला संशय होता. या विषयावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे. शनिवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी सुनीलने मद्यपान केलं होतं. मुनेश किचनमध्ये जाऊन फोनवर बोलत होत्या. यावरुन सुनीलचा संताप अनावर झाला आणि त्याने आपली सर्व्हिस रिवॉल्व्हर काढून मुनेश यांच्या छाती आणि पोटात गोळ्या झाडल्या. गोळीबारात मुनेश यांचा जागीच मृत्यू झाला.

पतीने गोळी झाडली तेव्हा मुनेश धाकट्या बहिणीशी बोलत होत्या. पतीने गोळी झाडल्याचंही त्यांनी बहिणीला फोनवर सांगितल्याचं म्हटलं जातं.

हत्येनंतर आरोपी पती पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन मुनेश गोदारा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

मुनेश आणि सुनील यांचा विवाह 2001 मध्ये झाला होता. मात्र सुरुवातीपासूनच दोघांमध्ये फार सलोख्याचे संबंध नव्हते. सततच्या भांडणांना कंटाळून 2012 मध्ये आरोपी सुनीलने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. परंतु कौटुंबिक प्रकरण असल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.

 

‘माझा मुलगा पत्नी आणि मुलीसह इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहत होता. सुरक्षा अधिकारी असल्यामुळे त्याच्याकडे बंदूक होती, अशी माहिती मुनेश गोदारा यांचे सासरे आणि आरोपीचे वडील चंद्रभान यांनी गुरुग्राम पोलिसात केलेल्या तक्रारीत दिली.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळी मुनेश गोदारा यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. पक्षाच्या कामासंदर्भात मुनेश गोदारा (BJP Leader Munesh Godara Murder) यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली होती.