महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 12 फेब्रुवारी 2024 : भारतीय जनता पक्षाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या अभियानात सहभागी झाल्या असून त्यांनी बीड शहराजवळ असलेल्या नारायण गडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतलं आणि तिथून पोंडूळ या गावी लोकांशी संवाद साधून मुक्काम केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. मात्र त्यांच्या एका विधानामुळे मोठी चर्चा रंगली आहे. ‘ मला मतदारसंघ राहिलेला नाही ‘ अस विधान करत पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
मला मतदारसंघच उरला नाही
पोंडूळ येथे ग्रामस्थांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मन की बात लोकांच्या समोर ठेवली. मागच्या पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते आणि ती होणं स्वाभाविक आहे कारण लोकांना आणि मीडियाला असं वाटतं की मला एखादी उमेदवारी मिळावी. तशीच आता सुद्धा चर्चा होते असं मत पंकजा यांनी व्यक्त केलं.
यावेळी त्यांनी एक मोठं विधानही केलं. ‘आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघ राहिलेला नाही’ असे सांगत पंकजा मुंडे यांनी मला लोकसभेला जायला आवडेल का राज्यसभेला जायला आवडेल हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झालाय, असं म्हटलं. मला कुठे जायला आवडेल यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचंय हे महत्त्वाचं आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
भाजपच्या अभियानात सहभागी
भाजपच्या गाव चलो अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी आहेत. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलं. “तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला आज इथे कुंकू लावलं, मला कडक लक्ष्मीचे रूप दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं. मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. त्यांना चहा विकावा लागला. शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते, शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या”, असंही त्या म्हणाल्या.