मुंबई | 8 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनात पक्षाने गेल्या आठवड्यात 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधी पक्षांनी भाजपावर टीका करत हात धुवून घेतले. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही या मुद्यावरून टीका केली होती. महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, त्यांना डावयलायचं असा प्रयत्न सुरू असल्याचे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. मात्र मात्र आता त्यांच्या या टीकेला भाजपाने चोख प्रत्युत्तर देत राऊतांवर कडाडून हल्ला चढवला. ‘आदरणीय नितीन गडकरीजी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये’ अशा शब्दांत भाजपाने राऊतांना सुनावले.
राऊतांचा राग नाही कीव येते
भारतीय जनता पक्षाच्या X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावण्यात आले. तसेच त्यांचा घरगडी असाही उल्लेख करण्यात आला. ‘ संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते.
महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत ‘ असे या पोस्टमध्ये लिहीण्यात आले आहे.
संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते.
महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 8, 2024
राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं
काल राऊत यांनी प्रकाश जी आंबेडकर यांना ‘ हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे.
आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठा मध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. आदरणीय नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असेही या पोस्टमधून सुनावण्यात आले.