मुंबई | 13 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कालपासून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि संवाद मेळाव्यातून संवाद साधत स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षाला बळकटी देणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेत्याने खोचक टीका केली आहे. ‘बैल गेला आणि झोपा केला… जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीत…’ अशा शब्दांत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणला.
आता जाग येऊ काय उपयोग ?
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते,तेव्हा मातोश्रीमधून बाहेरच पडले नाहीत. जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा ते घरात बसले. जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा त्यांनी संवाद साधला नाही. आता जेव्हा अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली तेव्हा त्यांना जाग आलीय परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला आता काहीच लागणार नाही… आता जाग येऊन काय उपयोग ? असा खोचक सवालही दरेकर यांनी विचारला.
श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत
काल नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये खासदार हेमंड गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. मात्र त्यांच्या या घोषणेवरून महायुतीत धुसफूस आहे. अनेकांना त्यांचा हा निर्णय पटलेला नाही. या मुद्यावरही प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाही आहे. एक वेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं असत तर आपल्याशी बोललो असतो. तीनही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल कुठेही विसंवाद होणार नाही. ज्या जागा त्यांना वाटतात त्या जागा त्या मागतात. ज्या जागा योग्य असतील त्या त्यांना मिळतील, असेही दरेकर म्हणाले.