नवी दिल्ली: ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चौकीदार चोर असल्याचं ओरडत सुटले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत:च्या फायद्यासाठी राफेल व्यवहारावरुन खोटेनाटे आरोप केले. सुप्रीम कोर्टाने त्यांचा बुरखा फाडला. आता राहुल गांधींनी देशाची माफी मागावी आणि खोट्या माहितीचा सोर्स सांगावा, असं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले.
राफेल व्यवहार प्रकरणात घोटाळा झाला नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तसंच या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर हल्ला चढवला.
सर्व चोर एकत्र होऊन, चौकीदाराला चोर चोर म्हणू लागले, तरी जनता कधी चौकीदाराला चोर म्हणणार नाही. ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चौकीदार चोर असल्याची आवई उठवतात, असं अमित शाह म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने राफेल विमान खरेदी व्यवहार पारदर्शी असून, या व्यवहारात कोणताही संशय नसल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे स्वत:च्या फायद्यासाठी खोटेनाटे आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी, असं अमित शाह म्हणाले.
याशिवाय अमित शाह यांनी कशाच्या आधारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले याचा पुरावा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तसंच राफेल व्यवहार हा कोण्या व्यक्तीचा नव्हता तर दोन देशांमधला करार आहे. ही लढाऊ विमान ना अंबानी बनवणार आहे, ना भारत बनवणार आहे, ही विमानं फ्रान्समधूनच बनून येणार आहेत. जर दोन देशांमधला करार असेल, तर पंतप्रधानांना चोर म्हणण्याचा संबंध काय? त्यामुळे राहुल गांधींनी बालीशपणा सोडून माफी मागायला हवी, असं अमित शाह म्हणाले.
संबंधित बातमी
राफेल परीक्षेत मोदी पास, व्यवहारात कोणताही संशय नाही: सुप्रीम कोर्ट