मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : भारतीय जनता पक्ष शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भाजपमध्ये जाण्याच्या दिशेने हालचाल सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मोठ्या
नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चादेखील सुरू आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. हा बडा नेता कोण आणि शरद पवार गटाची यावर खेळी काय असले याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसला मोठे धक्के
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक मोठे नेते, माजी आमदार पक्षांतर करताना दिसत आहेत. महाविकास आघआडीतील पक्षांमध्ये मोठी गळती सुरू असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसला लागोपाठ मोठे धक्के बसले. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांसारखे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी एकामागोमाग एक पक्षाला रामराम ठोकला.
शरद पवार गटाचा नेता भाजपच्या वाटेवर
आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये अनेक मोठे नेते गेल्या काही काळात आले आहेत. आता भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांचा निकटवर्तीय असलेला आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या काही काळात, लवकरच तो नेता भाजपवासी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठं खिंडार पडेल. आता हा मोठा नेता कोण आणि तो खरचं शरदप पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 42पेक्षा अधिक जागा जिंकायच्या असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ( शरद पवार गट) मोठे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत, तरच हे शक्य होईल अशी भाजपची भूमिका आहे.