मुंबई : ‘कोरोना’ भारतात हातपाय पसरु लागत असतानाच सर्व स्तरातून मदतीचा ओघही मिळताना दिसत आहे. ‘आतापर्यंत मी जे कमावलं, ते भारतीय नागरिकांमुळेच’ असं म्हणत नव्या दमाचा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने एक कोटी रुपयांची मदत ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला केली आहे. (Kartik Aaryan donates One Crore to PMCares Fund)
‘राष्ट्र म्हणून एकत्र उभं राहण्याची गरज आहे. मी जो कोणी आहे, जो पैसा मी आतापर्यंत कमावला आहे, तो फक्त भारतातील जनतेमुळे. आपल्यासाठी मी ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला एक कोटी रुपयांचे योगदान देत आहे. मी सर्व भारतीयांना आवाहन करतो, त्यांनी आपल्या परीने शक्य तितकी मदत करावी’ असं कार्तिकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे. ‘पूर्वीपेक्षा आता एकमेकांची जास्त गरज आहे. चला आपला पाठिंबा दर्शवू’ असंही त्याने पुढे लिहिलं आहे.
मोदींनी जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यू’नंतर कार्तिक आर्यनने नागिरकांना घरात बसण्याचे आवाहन केले होते. ‘प्यार का पंचनामा’ सिनेमात कार्तिक आर्यनचा डायलॉग गाजला होता. त्याच स्टाईलमध्ये कार्तिकने मोदींच्या आवाहनाला जोरदार पाठिंबा दर्शवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.
हेही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री ‘कोरोना’ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी
दरम्यान, अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची मदत केली आहे, तर अनुष्काने आपल्या योगदानाचा तपशील सांगितलेला नाही.
बॉलिवूडमधील कोणाकडून किती मदत? (Kartik Aaryan donates One Crore to PMCares Fund)
अक्षयकुमार 25 कोटी
प्रभास 4 कोटी
बॉक्स ऑफिस इंडिया 3 कोटी
अल्लू अर्जुन 1.25 कोटी
अभिनेता पवनकल्याण 1 कोटी
मराठी कलाकारांची मदत
अभिनेत्री सई ताम्हणकरने कोरोनाशी लढा देण्यासाठी दीड लाखांची मदत केली. तर ‘अप्सरा’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला गुप्त मदत केली आहे. अभिनेता सुशांत शेलार आणि दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी बॅकस्टेज कलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला. सुशांत शेलारने रंगमंच कर्मचाऱ्यांना गृहोपयोगी वस्तू दिल्या, तर प्रशांत दामले यांनी 23 जणांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिले.