पुणे : फेअरवेल पार्टीला हॉटेलमध्ये आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना (Bouncers Beat College Students) हॉटेलच्या बाऊन्सरने मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. पुण्याच्या पाषाण येथील महाबळेश्वर चौकातील हॉटेल ‘ठिकाणा’ येथे गुरुवारी (27 फेब्रुवारी) हा प्रकार घडला. या घटनेत मारहाण झालेल्या दोन विद्यार्थांचे डोकं फुटलं. याप्रकरणी हॉटेलमधील बाऊन्सर आणि त्यांच्या साथीदारांविरुध्द चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक उत्तम कदम (वय 20) हा पुण्याच्या सिम्बायोसीस महाविद्यालयात (Bouncers Beat College Students) वाणिज्य शाखेत व्दितीय वर्गात शिक्षण घेत आहे. प्रतीक त्याच्या काही मित्रांसोबत पाषाण येथील हॉटेल ‘ठिकाणा’ येथे गुरुवारी फेअरवेल पार्टीसाठी आला होता. रात्री 8.30 च्या सुमारास हे सर्व मित्र या हॉटेलमध्ये जमले. त्यानंतर 11.50 च्या दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाने गाणी बंद केली. त्यामुळे प्रतीक आणि त्यांच्या मित्रांनी गाणी पुन्हा लावण्यास सांगितलं. मात्र, हॉटेल व्यवस्थापनाने गाणी लावण्यास नकार दिला. त्यावरुन विद्यार्थी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.
यानंतर प्रतीक आणि त्याचे मित्र हॉटेलमधून बाहेर पडले. तेव्हा या विद्यार्थांना हॉटेलच्या दहा-बारा बाऊन्सरने लोखंडी डांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थांना मोठी दुखापत झाली. या घटनेनंतर विद्यार्थी आणि हॉटेल व्यवस्थापनाने एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस (Bouncers Beat College Students) अधिक तपास करत आहेत.