बहीण-आईच्या मदतीने ‘बारावी टॉपर’ गर्लफ्रेण्डची हत्या, तरुणाला फाशी

| Updated on: Aug 03, 2019 | 6:16 PM

आई आणि बहिणीच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद सिंघलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बारावी टॉपर श्वेता अग्रवालला दोन वर्षांपूर्वी जिवंत जाळण्यात आलं होतं.

बहीण-आईच्या मदतीने बारावी टॉपर गर्लफ्रेण्डची हत्या, तरुणाला फाशी
Follow us on

गुवाहाटी : आसाममधील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता अग्रवालच्या हत्येप्रकरणी (Shweta Agarwal Murder Case) बॉयफ्रेण्ड गोविंद सिंघलला फाशीची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली आहे. आरोपी तरुणाने दोन वर्षांपूर्वी बहीण आणि आईच्या मदतीने श्वेताची निर्घृण हत्या केली होती. श्वेता ही इयत्ता बारावीत असताना आसाम बोर्डातून राज्यात अव्वल आली होती.

आसाममधील गुवाहाटीतल्या एका कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या श्वेता अग्रवालच्या हत्येने दोन वर्षांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. डिसेंबर 2017 मध्ये श्वेताचा मृतदेह प्रियकर गोविंद सिंघलच्या घरातील बाथरुममध्ये आढळला होता.

आसाममधील फास्ट ट्रॅक कोर्टाने श्वेताच्या हत्येप्रकरणी गोविंदला फाशीची शिक्षा सुनावली होती. तर त्याच्या आई आणि बहिणीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार श्वेता 4 डिसेंबर 2017 रोजी गोविंदच्या गुवाहाटीमधील घरी गेली होती. लग्नाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये यावेळी वाद झाला. त्यावेळी गोविंदने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. जोरदार किंचाळून श्वेता बेशुद्ध पडली.

बेशुद्धावस्थेत असलेल्या श्वेताला गोविंद, त्याची आई आणि बहिणीने जिवंत जाळलं. तिच्या मृत्यूला आत्महत्येचं स्वरुप देण्याचा प्रयत्न तिघांनी केला होता. पोलिसांच्या तपासात गोविंद सिंघल आणि त्याचं कुटुंबीय दोषी आढळलं. 30 जुलै रोजी गुवाहाटी कोर्टाने गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावली होती.

कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी असलेली श्वेता 2015 साली इयत्ता बारावीत राज्यातील टॉपर होती. हत्येवेळी गुवाहाटीच्या के सी दास कॉमर्स कॉलेजात ती द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती.