बंगळुरु : बीएस येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच शेतकऱ्यांना सर्वात मोठं गिफ्ट दिलंय. शिवाय कुमारस्वामी सरकारने जुलै महिन्यात घेतलेले सर्व निर्णय पुन्हा एकदा समीक्षा होईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेशिवाय दोन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये दिले जातील, अशी घोषणाही येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
जुलै 2019 मध्ये ज्या योजनांना मंजुरी देण्यात आली होती, त्या पुढील समीक्षा होईपर्यंत तातडीने स्थगित करण्यात याव्यात, असं पत्र कर्नाटकचे मुख्य सचिव टीएम विजय यांनी सर्व विभागांच्या सचिवांना पाठवलं. यामुळे अनेक आर्थिक व्यवहारांचीही पुन्हा एकदा समीक्षा केली जाणार आहे.
कर्नाटकच्या शेतकऱ्यांना वर्षाला दहा हजार मिळणार
येदियुरप्पा यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे आभार मानत मोठी घोषणा केली. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये दिले जात आहेत. राज्य सरकारकडूनही वर्षाला चार हजार दोन टप्प्यांमध्ये दिले जातील, अशी घोषणा त्यांनी केली. 29 जुलैला सकाळी 10 वाजता बहुमत सिद्ध केल्यानंतर वित्त विधेयक मंजूर केलं जाईल, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून किसान सन्मान योजनेंतर्गत 2000 रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. यामध्ये आता राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 4000 रुपयांची भर पडल्याने शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये मिळणार आहेत.
कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस यांचं सरकार पडल्यानंतर दोन दिवसात भाजपने सत्ता स्थापन केली आहे. भाजप नेते बी. एस. येदियुरप्पा यांनी शुक्रवारी सायंकाळी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येदियुरप्पा यांना 31 जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.