बुलडाण्यात बेपत्ता 3 चिमुकले लाल कारमध्ये आढळले, दोघांचा गुदमरुन मृत्यू

| Updated on: Jul 16, 2019 | 10:19 AM

बुलडाणा शहरातील हरवलेली तीन बालके बंद कारमध्ये आढळली. धक्कादायक म्हणजे यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक मुलगी जिवंत सापडली.

बुलडाण्यात बेपत्ता 3 चिमुकले लाल कारमध्ये आढळले, दोघांचा गुदमरुन मृत्यू
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा शहरातील हरवलेली तीन बालके बंद कारमध्ये आढळली. धक्कादायक म्हणजे यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक मुलगी जिवंत सापडली. ही तीनही बालके बुलडाणा शहरातून काल दुपारी 1 पासून बेपत्ता होती. अंगणवाडीत गेलेल्या या बालकांचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आज पहाटे तीनच्या सुमारास ही मुलं बंद कारमध्ये आढळली. त्यापैकी दोघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर तिसरी मुलगी सहर जिवंत आढळली. तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ही तीनही मुलं सोमवारी 15 जुलै दुपारी एकपासून बेपत्ता होती. त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत होतं.  या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून शहरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. मात्र या बालकांचा थांगपत्ता लागत नव्हता.

16 जुलैच्या रात्रीपासून गुरु पौर्णिमा लागत असल्याने हे अपहरण नरबळीसाठी झाल्याची चर्चा वर्तविली जात होती. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बुलडाणा शहरातील गवळीपुरा  भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे दोन नातू आणि एक नात नेहमीप्रमाणे अंगणवाडी केंद्रात गेले होते. सहर शेख (4 वर्ष), साहील शेख (5 वर्ष) आणि अजीम शेख (3वर्ष) हे तिघेही शाळेत गेले.

दुपारी बारावाजेपर्यंत ही मुलं घरी परत येणे अपेक्षित होतं. मात्र एक वाजेपर्यंत ते घरीच परतले नसल्याने, घरच्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहणी केली. मात्र तिथेही ते नव्हते.

यानंतर संपूर्ण शहरात या बालकांची शोधाशोध करण्यात आली. पण ते न मिळून आल्याने याबाबतची तक्रार संध्याकाळी शहर पोलिसात दाखल करण्यात आली. तीनही बालकांचे अपहरण झाल्याची शक्यता असल्याने याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी गवळीपुरा परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीची मदत घेत तपास सुरु केला. पण पोलिसांना हाती काही लागलं नाही. मग पोलिसांनी परिसरातील प्रत्येक घराची तपासणी सुरु केली. त्यावेळी टिपू सुलतान चौकासमोरील गवळीपुराला लागून असलेल्या एका घरासमोर लाल कार उभी होती. पोलिसांनी काचेतून त्या कारमध्ये डोकावून पाहिलं. शिवाय पोलिसांनी काचेवर ठोकलं असता, 4 वर्षांची सहर उठून बसली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारचे दरवाजे उघडले असता, अन्य दोन मुलं बेशुद्धावस्थेत आढळले.

पोलिसांनी तातडीने तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी साहील आणि अजीम शेख यांना मृत घोषित केलं.