बुलडाणा : घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुलडाण्यात घडली (Buldhana wall collapsed). यामध्ये एका गर्भवती महिलेसह सहा वर्षीय लहान मुलाचाही समावेश आहे. तर या दुर्घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील मेहकर शहरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात राहणारं शेख कुटुंब गुरुवारच्या रात्री (19 सप्टेंबर) गाढ झोपेत असताना अचानक घराशेजारील घराची भिंत कोसळली. या अपघातात शेख कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या मेहकरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुरुवारी दिवसभर बुलडाणा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील मेहेकर येथेही मुसळधार पाऊस बरसत होता. याच दरम्यान शहरातील इमामवाडा चौकात राहणाऱ्या शेख कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं. रात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास हे कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक त्यांच्या घराशेजारील घराची जूनी मातीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने कुटुंबातील सर्वच पाचजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले.
भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजारी जागे झाले आणि ते शेख कुटुंबाच्या मदतीला धावून आले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलीस आणि नागरिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेख कुटुंबियांना बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथे डॉक्टरांनी पाचपैकी तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मृतांमध्ये पती, आठ महिन्यांची गर्भवती पत्नी आणि एका सहा वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. शेख असिफ शेख अशरफ (वय 28) , शाहिस्ता बी शेख असिफ (वय 25)आणि जुनेद शेख असिफ (वय 6)अशी मृतांची नावं आहेत.
अशा दुर्वैवी घटनेतही प्रशासनाची नामुश्मी दिसून आली. भिंत कोसळल्यानंतर परिसरातील नागरीकांनी 108 या मदत क्रमांकावर फोन करत रुग्णवाहिकेची गरज असल्याचं सांगितलं. मात्र, यावेळी आमच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध नाही, जी आहे ती बिघडलेली आहे, ड्रायव्हरही नाही, डॉक्टरही नाही असं उत्तर मिळालं. अखेर नागरीकांनी या जखमी कुटुंबियांना खाजगी रुग्णालयात दाखल केलं. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणावर नागरिकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.