Bullet Train Project : मुंबई ते अहमदाबाद या 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महत्वाचा असलेल्या बीकेसी ते शिळफाटा दरम्यानच्या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीचा एडीआयटी (ADIT) बोगदा खणण्याचे काम ( Additionally Driven Intermediate Tunnel ) पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनचा देशातील समुद्राखाली ( 7 किमी ठाणे खाडी ) भाग असलेला देशातील पहिलाच बीकेसी ते शिळफाटा हा बोगदा दोन टप्प्यात खणण्याचे काम या एडीआयटी (ADIT) बोगद्यामुळे शक्य होणार आहे.
अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे ( एडीआयटी ) खोदकाम पूर्ण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. 26 मीटर खोल झुकलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग मेथड (NATM) द्वारे 3.3 किमीच्या ( अंदाजे ) बोगद्याचे बांधकाम करणे सुलभ होणार आहे. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी 1.6 मीटरच्या ( अंदाजे ) बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल. एकूण 21 किमीच्या बोगद्याच्या बांधकामापैकी 16 किमी बोगद्याचे काम ( टीबीएम ) टनेल बोअरिंग मशिनद्वारे होणार आहे. तर उर्वरित 5 किमीचे बोगद्याचे काम न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग मेथड ( NATM ) तंत्रज्ञानाद्वारे होणार आहे.
11 मीटर X 6.4 मीटरचे एडीआयटी बोगद्यामुळे बांधकाम आणि ऑपरेशनदरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश मिळणार आहे. या बोगद्यात प्रकाशाची पुरेशी व्यवस्था असणार आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत ( safe excavation ) मजूरांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने देखील या बोगद्याचा वापर होऊ शकतो अशी माहीती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. या कामासाठी एसएसपी (सरफेस सेटलमेंट पॉइंट), ओडीएस (ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर ) किंवा दोन्ही अक्षातील विस्थापनासाठी टिल्ट मीटर, बीआरटी (टार्गेट/थ्रीडी टार्गेटप्रतिबिंबित करून), बोगद्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म ताणांसाठी स्ट्रेन गेज, पीक पार्टिकल व्हेलोसिटीसाठी सिस्मोग्राफ (पीपीव्ही) किंवा व्हायब्रेशन अँड सिस्मिक वेव्ह मॉनिटर ही उपकरणे वापरली जात आहेत.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई बुलेट ट्रेन स्थानक बीकेसी ते शिळफाटा या 21किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. या बोगद्याचा 7 किमीचा ( अंदाजे ) भाग ठाणे खाडी ( Intertidal zone ) येथे समुद्राखाली असेल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात येत आहे.
येथे पाहा ट्वीटरची पोस्ट ( एक्स ) –
#MAHSR बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीचा अतिरिक्त ड्राइव्हन इंटरमीडिएट बोगदा (ADIT) खोदला आहे. त्यामुळे BKC आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या मुख्य बोगद्याचे उत्खनन (NATM भाग) दोन टप्प्यांत सुरू होईल असे @nhsrcl ने म्हटले आहे. pic.twitter.com/AVe4dp8ZsB
— Atul B. Kamble (@atulkamble123) May 27, 2024
21 किमी लांबीचा हा बोगदा बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन अशा दोन ट्रॅकला एकाच बोगद्यात सामावून घेणारा सिंगल ट्यूब बोगदा असणार आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी 13.6 मीटर व्यासाच्या कटर हेड असलेल्या टनेल बोरिंग मशिनचा ( टीबीएम ) वापरण्यात येणार आहे. सामान्यत: एमआरटीएस – मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शहरी बोगद्यांसाठी 6 – 8 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात, कारण हे बोगदे केवळ एका ट्रॅकसाठी तयार करण्यात आले आहेत. बीकेसी, विक्रोळी आणि सावली शीळफाटा येथे निमार्ता तीन शाफ्टमुळे टीबीएमच्या माध्यमातून 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणे शक्य होणार आहे.
गुजरात राज्यात बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या राज्यात येत्या डिसेंबर 2026 रोजी बिलीमोरा ते सुरत दरम्यान बुलेट ट्रेनची चाचणी होणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड बुलेट ट्रेनच्या निर्मितीचे काम जपानच्या मदतीने करीत आहे.