नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नुकतेच नागरिकांना सार्वजनिक कॅफेवर आधार कार्डचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा (Alert)दिला आहे. याविषयीचे एक ट्विट करत, प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी ई-आधार (E-Aadhaar) डाऊनलोड करण्यापासून वाचण्याचे आवाहन केले आहे.
बँक खाते, डी-मॅट खाते अथवा केवायसीसाठी आधार सत्यापन करण्याची गरज असते. त्यामुळे आधार हे महत्वपूर्ण दस्तावेज झाला आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे मुख्य सूचना अधिकारी निलेश सांगोई यांच्या माहितीनुसार, आधार कार्ड क्रमांक, जन्म तारीख यावरुन कोणीही तुमचे बँके खाते हॅक करू शकत नाही.
ग्रंथालय, सायबर कॅफे, हॉटेल अथवा सार्वजनिक ठिकाणी बँकिंग सेवेचा वापर करु नका, केल्यास त्वरीत असे खाते लॉग आऊट करा, असा सल्ला देण्यात येत आहे. खाते तसेच ठेवल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो.
तुमचे आधार कार्ड दाखवत बँकेत थेट जाऊन तुमच्या खात्यातून कोणीही रक्कम काढू शकत नाही. त्यासाठी त्याला नमुन्यातील विड्रॉल स्लीप भरून द्यावी लागेल. तुमचे हस्ताक्षर त्यावर असणे आणि रेकॉर्ड मिळणे आवश्यक असतील. केवळ आधार कार्ड दाखवून तुमच्या खात्यातून रक्कम काढता येत नाही.
तर एटीएम मशिनवरही एटीएमच्या आधारे रक्कम काढता येत नाही. त्यासाठी पिन आणि मोबाईलवर येणारा ओटीपी सबमिट करावा लागतो. त्याआधारे रक्कम काढता येते. ही माहिती केवळ एटीएम धारकाकडेच असते.
तुमचा आधार कार्ड वापरुन तुमचे बँक खाते हॅक करता येत नाही. परंतु, त्याचा दुरुपयोग करता येऊ शकतो. तुमच्या ओळखपत्राचा गैर वापर करता येऊ शकतो. सायबर घोटाळे वा अन्य घोटाळ्यासाठी या कार्डचा दुरुपयोग करता येऊ शकतो.
त्यामुळे सार्वजनिक सायबर कॅफे अथवा इतर ठिकाणी तुम्ही ई-आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर तुमच्या कार्डसंबंधीची माहिती तुम्ही धोक्यात टाकत आहे. तेव्हा आधार कार्ड डाऊनलोड केले आणि त्याचा वापर केल्यास ते त्वरीत डिलीट करणे आवश्यक आहे.
सायबर भामटे या आधार कार्ड क्रमांक आणि इतर माहिती आधारे तुमची माहिती चोरु शकतात. यामध्ये तुमच्या आंगठ्याचे निशाण, बायोमॅट्रीक डेटा आणि इतर तपशीलाचा समावेश असतो. त्याचा इतर कामासाठी दुरुपयोग करण्यात येऊ शकतो.