नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियांका गांधी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगड मुख्य न्यायदंडाधिकारी(CJM)न्यायालयात वकील प्रदीप गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
सोनिया गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि असदुद्दीन ओवैसी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship Act Protest) चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप प्रदीप गुप्ता यांनी केला आहे. यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मेरठ बॉर्डरवर पोलिसांनी थांबवलं आणि त्यांना दिल्लीला परतावं लागलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मेरठमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जोत होते. मात्र, शहरात सध्या कलम 144 लागू आहे, असं सांगत अधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांना परत जाण्यास सांगितलं.
दुसरीकडे, सोमवारी (23 डिसेंबर)चेन्नईत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रॅली काढल्याबाबत डीएमके पक्षप्रमुख एमके स्टाली यांच्यासह आठ हजार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या परवाणगीशिवाय हा मोर्चा काढल्याचा आरोपाखील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.