मुंबई : राज्यातील खेडेगावांना ठेवण्यात आलेली जातिवाचक नावं बदलण्याची चिन्हं आहेत. वस्त्या, वाड्यांना जातींवरुन ठेवलेली नावं रद्द करण्यासाठी ठाकरे सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता (Caste Based Villages to be renamed) आहे.
सामाजिक न्याय विभाग यासंबंधी प्रस्ताव आणणार असल्याची माहिती आहे. दुपारी दोन वाजता मंत्रालयात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची चिन्हं आहेत. वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावं ठेवण्याचा विचार आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले होते. काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असते. यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचं मुंडेंनी सांगितलं होतं.
कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होईल. राज्यात जातीवर आधारित असलेल्या वस्तींची नावं बदलण्याचं काम पूर्ण होईल. वंचितातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी अनेक बदल करण्याची गरज आहे. यातून काही घटकांची मनं दुखावली जातील, पण हे बदल होणे गरजेचे आहेत. पण ते होणारच, अशी खात्री मुंडे यांनी व्यक्त केली होती.
जातिवाचक नावांमुळे ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते. मात्र समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचा संदेश देण्यासाठी ठाकरे सरकार अशाप्रकारचा आगळावेगळा निर्णय घेण्याची शक्यता (Caste Based Villages to be renamed) वर्तवली जात आहे.