नोएडा (उत्तर प्रदेश) : सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहेत. या निकाला दरम्यान नोएडामध्ये सर्वांना आश्चर्यचकीत करेल अशी घटना घडली आहे. नोएडामध्ये 16 वर्षीय विनायक श्रीधर याचे 26 मार्च रोजी ‘ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफी’ आजारामुळे निधन झाले. तो नोएडा येथील एमिटी इंटरनेशनल शाळेतील दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याने नुकतेच सीबीएसईमध्ये दहावीची परिक्षा दिली. यावेळी त्याने तीन पेपरही दिले होते. पण चौथ्या पेपेरपूर्वीच त्याचे निधन झाले. सोमवारी (6 मे) त्याच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधील त्याला इंग्रजीमध्ये 100 गुण, विज्ञानमध्ये 96 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळाले आहेत.
विनायकला पेपरमध्ये मिळालेले गुण पाहून सर्वचजण आश्चर्यचकीत झाले आहेत. विनायकला अभ्यासाची खूप आवड होती आणि यापूर्वीही त्याने परिक्षेत उत्कृष्ट असे गुण मिळवलेले आहेत. यंदाही त्याने तीन पेपरमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. मात्र आजारपणामुळे त्याचे निधन झाले. विनायकने जर सर्व पेपर दिले असते, तर नक्कीच तो टॉपर विद्यार्थ्यांच्या यादीत असता, असं शाळेतील शिक्षक म्हणाले. विनायक वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना आदर्श मानत होता.
विनायक जेव्हा दोन वर्षाचा होता, तेव्हापासून त्याला ‘ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफी’ हा आजार आहे. जगात 3500 मुलांमध्ये एका मुलाला हा आजार होतो. या आजारावर आतापर्यंत काहीच उपचार नाही.
या आजारात मुलगा जसा मोठा होतो, तशाप्रकारे आजार वाढत जातो. विनायक जेव्हा सात वर्षाचा झाला, तेव्हा त्याने चालणे सोडून दिले होते. व्हील चेअरच्या सहाय्याने तो सर्व काम करत होता. हातही त्याचे खूप हळू काम करत होते. विनायकला अभ्यासाची खूप आवड होती. त्याला मोठे होऊन अंतराळवीर बनाण्याची ईच्छा होती, असं विनायकचे वडील श्रीधर यांनी सांगितले.
विनायकने सीबीएसईच्या परिक्षेत सहभाग घेतला होता. लिहण्यामध्ये त्याच्या हाताचा वेग खूप कमी होता. पण डोक्याने तो खूप हुशार होता. संस्कृत त्याचा सर्वात आवडता विषय होता. यावेळी त्याने संस्कृत विषय स्वत:च्या हाताने लिहिला होता, तर इंग्रजी आणि विज्ञान विषयासाठी त्याने सहाय्यकाची मदत घेतली होती.
दरम्यान, विनायकचे वडील श्रीधर जीएमआर कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत आहेत. आई ममता गृहिणी आहे. मोठी बहिण वैष्णवी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामधून पीएचडीचे शिक्षण घेत आहे. या तिघांवरही विनायकच्या निधनामुळे धक्का बसला आहे.