राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज रविवारी नागपूर येथील राजभवनात झाला. राजभवनाच्या हिरवळीवर हा शपथविधी सोहळा रंगला. यावेळी एकूण नव्या मंत्रिमंडळातील ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली तर सहा जणांना राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. असे एकूण पहिल्या टप्प्यात एकूण ३९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात विस्तारात भाजपाने नऊ चेहऱ्यांना तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने पाच नव्या चेहऱ्यांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. राज्यभरात या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे त्या-त्या मतदार संघात पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ढोलताशाच्या गजरात जल्लोष केला आहे.
जळगावात शिवसेना एकनाथ गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी चौथ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांच्या पाळधी या गावी कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्याता आला आहे. कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवित, फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवित गुलाबराव पाटील पुन्हा मंत्री झाल्याने आनंद साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांना खांद्यावर घेत यावेळी नृत्य केले आहे. यावेळी एलईडी स्क्रीनवर टीव्ही ९ मराठी चॅलनवर हा सोहळा सर्वांनी अनुभवला आहे. गुलाबराव पाटील मंत्री झाल्याचा मोठा आनंद यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी साजरा केला.
भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या जामनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. यावेळी गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. भाजपाचे नेते गिरीश महाजन हे सातव्यांदा आमदार झाले असून त्यांनी चौथ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
यावेळी एकनाथ शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत आणि एकमेकांना मिठाई भरवित मालेगावात जल्लोष करण्यात आला. महायुतीने केलेले सूक्ष्म नियोजन आणि मतदार संघात केलेल्या विकास या जिवावर मतदार राजांनी पाचव्यांदा दादा भूसे यांना निवडून दिले आहे. यावेळी जल्लोषानंतर मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
भाजपाचे जयकुमार रावल यांनी मंत्रीमंडळात निवड होऊन त्यांचा शपथविधी झाल्याने त्यांच्या मामाच्या गावात जल्लोष करण्यात आला. सारंगखेडा येथे महाराणा प्रताप चौकात त्यांनी जल्लोष केला. मामा आणि नातेवाईकांनी हा आनंद उत्सव साजारा करण्यात आला. रावल यांचे मामा आणि गावातील नातेवाईकांनी हा जल्लोष केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. आणि केक कापत आनंद उत्सव साजरा केला. रावल यांचे मामा आणि चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्या मार्फत हा जल्लोष साजरा करण्यात आला होता.
रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांचा शपथविधी पाहण्यासाठी रत्नागिरीच्या खेड शहरात एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात टीव्ही ९ मराठी चॅनलवर हा सोहळा पाहिला जात होता.
भाजप आमदार गणेश नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गणेश नाईक यांच्या कोपरखैरणे येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिंडोरी शहरात जल्लोष करण्याता आला आहे. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत मिरवणूका काढल्या.