मध्य रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यातून नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४,९६६ कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहेत. गेल्यावर्षी याच काळात मध्य रेल्वेने प्रवासी वाहतूकीतून ४,६९९ कोटी रुपये मिळविले होते. अशा प्रकारे प्रवासी भाड्यातून मिळालेल्या उत्पन्नात ५.६८ % टक्क्यांची वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने नोव्हेंबर २०२४ पर्यंत गैर उपनगरीय मार्गाने ४,३२८ कोटी कमावले आहेत. जे गेल्यावर्षी याच कालावधीत कमावलेल्या ( ४,०९५ कोटी रुपये ) उत्पन्नाच्या ५.६९ % टक्के जास्त आहे. यावर्षी गैर उपनगरीय मार्गातून ६३८ कोटी रुपये जादा कमावले आहे. गेल्या वर्षी याच काळात कमावलेल्या ६०४ कोटी रुपयांच्या तुलनेत ५.६३% ने वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात नोव्हेंबर-२०२४ पर्यंत १०६४ दशलक्ष ( १०६.४ कोटी ) प्रवाशांची वाहतूक केली होती. गेल्या वर्षी याच काळात मध्य रेल्वेने १०३९ दशलक्ष ( १०३.९ कोटी ) प्रवाशांची वाहतूक केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवासी वाहतूकीत २.३५% ची वाढ झालेली आहे. यामध्ये या आर्थिक वर्षात १२७ दशलक्ष गैर – उपनगरीय ( १२.७ कोटी ) प्रवाशांचा समावेश आहे. गेल्या वर्षी १२१ दशलक्ष ( ) १२.१ कोटी ) गैर उपनगरीय प्रवाशांनी वाहतूक केली होती. यंदाची आकडेवारी पाहता यात ५.६१% वाढ झाली आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत ९३६ दशलक्ष उपनगरीय प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. गेल्यावर्षी याच काळात ९१८ दशलक्ष उपनगरीय प्रवाशांनी प्रवास केला होता. यावर्षी केवळ नोव्हेंबर २०२४ महिन्यात मध्य रेल्वेने १३८ दशलक्ष ( १३.८ कोटी ) प्रवाशांनी (१२२ दशलक्ष उपनगरीय ( १२.२ कोटी ) आणि १६ दशलक्ष ( १.६ कोटी ) गैर-उपनगरीय प्रवाशांनी प्रवास केला आणि ५५४ कोटी रुपयांचा महसूल( ८४ कोटी रुपये उपनगरीय उत्पन्न आणि ४७० कोटी गैर-उपनगरीय उत्पन्न ) मिळवले आहे.