कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे (Chandrakant Patil criticize CM Uddhav Thackeray for Kokan visit). निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावं असं वाटलं. दुसरीकडे आता 4 दिवसांनंतर शरद पवार यांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच या सरकारला नुकसानीचा अंदाजच आलेला नाही, असाही आरोप केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “निसर्ग चक्रीवादळानंतरचा पहिला प्रवास भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा झाला. त्यानंतर 3 महिने मातोश्रीबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटलं आपणही जावं. त्यांचा 2-3 तासाचा प्रवास झाला. आता 4 दिवसांनंतर शरद पवार यांनाही वाटलं आपणही गेलं पाहिजे. पहिला प्रवास तर काही तासातच प्रवीण दरेकर यांनी केला. मात्र, कालपासून कोकणाशी संबंधित भाजपचे सर्व आमदार काम करत आहेत. ते रत्नागिरी, रायगड या भागात प्रवास करत आहेत. केवळ प्रवास करुन आम्ही थांबलो नाही, तर आज 16 ट्रक साहित्य कोकणात पाठवले आहे. यात पत्रे ताडपत्री यांचा समावेश आहे. तेथील सर्व छपरं उडाली आहेत.”
“महिनाभर लाईट येणार नसल्यानं मोठ्या प्रमाणात सोलर कंदिल असं साहित्य घेऊन 16 ट्रक कोकणाकडे गेल्या आहेत. घरांची कौलं तर उडालीच आहेत, ती एकवेळ जनसहभागातून दुरुस्त करु. मात्र, तेथील पिकंही उद्ध्वस्त झालीत. ती एका वर्षाची पिकं नसतात. एक नाराळाचं झाडं पडलं तर पुढील 10 वर्षे मिळणारे नारळ जातात. त्यामुळे नुकसान मोजताना 10 वर्षांच्या नुकसानीचा विचार व्हावा. असंच आंबा, सुपारी, काजू या झाडांचं आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“या नुकसानीचा अंदाजच सरकारला आलेला नाही. या नुकसान भरपाईत एकरी किंवा हेक्टरी नुकसान भरपाई देऊन चालणार नाही. ती प्रति झाड द्यावी लागेल. कारण त्या प्रत्येक झाडाचं 10 वर्षांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे 100 कोटी किंवा 200 कोटी ही तुटपुंजी रक्कम आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. विरोधी पक्ष काहीही बोलतो असं नाही”, असंही चंद्रकात पाटील यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या :
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा
रायगडमधील वादळग्रस्त कुटुंबांना 5 लिटर मोफत केरोसिन देणार : छगन भुजबळ
Chandrakant Patil criticize CM Uddhav Thackeray for Kokan visit