नॉट रिचेबल बड्या नेत्याला फडणवीसांनी तात्काळ शोधलं होतं, अजित पवारांचा उल्लेख टाळत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 10, 2020 | 8:28 PM

चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांचा नामल्लेख टाळून महाराष्ट्रातील खूप मोठा नेता नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीसांनी एका तासात त्यांचा तपास लावल्याचा गौप्यस्फोट केलाय (Chandrakant Patil on Ajit Pawar being not reachable).

नॉट रिचेबल बड्या नेत्याला फडणवीसांनी तात्काळ शोधलं होतं, अजित पवारांचा उल्लेख टाळत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
Follow us on

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीतील मरकजच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून महाराष्ट्रातील खूप मोठा नेता नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीसांनी एका तासात त्यांचा तपास लावल्याचा गौप्यस्फोट केला (Chandrakant Patil on Ajit Pawar being not reachable). या प्रतिक्रियेनंतर आता अजित पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मरकजवरुन आरोप करणाऱ्यांनी त्यांचं स्वतःचं बघावं. त्यांना मरकजमधून राज्यात आलेले 125 लोक सापडत नाही. यासाठी ते मोबाईल बंद असल्याचं कारण सांगतात. मात्र, एखाद्यानं मोबाईल बंद केला तरी त्याचा पत्ता शोधता येतो. तंत्रज्ञान प्रगत असल्यानं एखाद्याने मोबाईल बंद केला, तरी त्याचा तपास काढता येतो. महाराष्ट्रातील खूप मोठा नेता मागे फोन बंद करून बसला होता. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती केली. नातेवाईकांच्या विनंतीनंतर तासाभरात ते कुठल्या फ्लॅटवर आहे हे शोधून काढलं.”

मरकजमधील नमाज सुरु असून तुम्ही त्यांना नियंत्रित करु शकत नाही. एखाद्याच्या खासगी जागेत एखादा कार्यक्रम होत असल्यास परवानगीचा विषय येत नाही. या संदर्भात आम्ही यावर चर्चा करु. मात्र, तुम्ही तुमचं बघा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. मंत्र्यावर चुकीची पोस्ट टाकल्यावर बंगल्यावर नेऊन मारहाण केली जाते. कायदा हातात घेतला जातो आणि दुसरा मंत्री बँक घोटाळ्यातील आरोपींना माथेरानला फिरायला पाठवतो. यातून गृहमंत्र्यांचं नियंत्रण राहिलं नाही असं दिसतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

“अजित पवार एक बोलतात आणि उद्धव ठाकरे एक बोलतात”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “या कठीण काळात सरकारमध्ये टीमवर्क नाही. अजित पवार एक बोलतात आणि उद्धव ठाकरे एक बोलतात. आपापसात समन्वय नसून उद्धव ठाकरे अनुभव नसताना खूप करत आहे. मात्र त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची हवी तेवढी साथ मिळत नाही. विरोधी पक्षांनाही बरोबर घेताना दिसत नाही. कोरोना व्हायरसमुळे राज्य सध्या संकटात आहे. अशावेळी सरकारनं विरोधी पक्षाला हातात हात घेऊन काम केलं पाहिजे. त्यामुळे अधिक ताकदीने लढू शकतो. मात्र सरकारनं एकदाही विरोधीपक्षासोबत बैठक घेतली नाही. व्हिडिओ कॉन्फरन्स करु शकत नाही का?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रिपदाचा अनुभव शून्य आहे, तरी ते धनुष्यबाण उचलत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना इतर सहकाऱ्यांची साथ मिळताना दिसत नाही. सर्वजण आपल्या घरात मुख्यमंत्र्यांची मजा पाहत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसेच या काळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकार बरोबर आहे, असंही नमूद केलं.

संबंधित बातम्या :

सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करा, आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

Corona : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6761 वर, तर 206 जणांचा मृत्यू

Chandrakant Patil on Ajit Pawar being not reachable