सोलापूर : मराठा समाजाच्या मेडिकल पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, “200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकेल. उर्वरीत 100 विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला आज पत्र देणार आहेत. सरकार या विद्यर्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे.”
विद्यार्थी आणि वैद्यकीय संचालक
दरम्यान, मराठा नेते विद्यार्थी आणि वैद्यकीय संचालक यांच्यात आज बैठक होत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही बैठक सुरु झाली. प्रवेश प्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशिका कायम राहावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे संयोजक आबा पाटील यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयानाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयानेही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात यंदा मराठा आरक्षण लागू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. 9 मे रोजी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याआधी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण यंदापासून लागू करण्यास नकार दिला होता. तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची आव्हान याचिका फेटाळली. शिवाय कोर्टाने सर्व प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत मराठा अरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश शेवटी जागा उरल्यास त्या जागांवर सामावून घ्यावे, असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं.
हायकोर्टाचा निर्णय काय होता?
यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला. पुढील वर्षापासून मराठा आरक्षण लागू करण्यात येणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमास लागू केलेले मराठा आरक्षण अवैध आहे, असा दावा खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी केला होता.
वाचा – यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाही
….तर राज ठाकरे मराठा आंदोलनाचं नेतृत्त्व करणार?
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच : सुप्रीम कोर्ट