नाशिक : नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला दिली आहे. (Chhagan Bhujbal says Decision about School reopening in Nashik to be taken after review meeting)
“आम्ही नाशिकमधील शाळांच्या बाबतीत उद्या बैठक घेऊन चर्चा करु. त्यानंतर निर्णय घेणार आहोत. मुलांना शाळेत पाठवायला पालकांची संमती मिळते की नाही, तेही बघितलं पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळात वेगवेगळी मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये” अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली.
“जगातील अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा विरोध आहे. पुन्हा त्सुनामीसारखी कोरोनाची लाट येऊ शकते. त्यामुळे संमतीपत्र द्यायला पालक तयार नाहीत. सरकार जबाबदारी ढकलत नाही. मात्र कोव्हिडची लागण होणार नाही, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. म्हणून स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे” असं भुजबळ म्हणाले.
“आता जगभरात कोरोनाची जी दुसरी लाट येत आहे, ती पूर्वीपेक्षा भयंकर आहे. लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नका” असं भुजबळांनी सांगितलं. “आजपासून रेमडिसिव्हर वापरु नका असं सांगितलं आहे. आता सगळं उपलब्ध आहे तर म्हणतात की वापरु नका” असंही भुजबळ म्हणाले.
“नाशिकमध्ये कोव्हिड मृत्यूदर सर्वात कमी आहे. याचं श्रेय व्यासपीठावर बसलेल्या अधिकाऱ्यांना आहे. मागणीपेक्षा पाचपट जास्त ऑक्सिजन आज नाशिकमध्ये उपलब्ध आहे. आपण परिस्थिती नियंत्रणात आणली. दसरा, दिवाळीला बाजारांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली, नो मास्क नो एन्ट्री सारखे उपक्रम महत्वपूर्ण ठरले. लॉकडाऊन काळात पोलीस रस्त्यावर उभे राहिले. यामुळे अनेक पोलिसांना लागण देखील झाली, असंही भुजबळांनी सांगितलं.
“कोश्यारी समजूतदार, योग्य निर्णय घेतील”
विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी योग्य निर्णय घेतील. ते समजूतदार आहेत, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. राज्य सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करुनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. (Chhagan Bhujbal says Decision about School reopening in Nashik to be taken after review meeting)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वीच विधानपरिषेसाठीच्या 12 सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यपाल या 12 सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणार का, अशी शंका उपस्थित झाली आहे. तसे झाल्यास महाविकासआघाडी सरकार न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
संबंधित बातम्या :
शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती
दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय
(Chhagan Bhujbal says Decision about School reopening in Nashik to be taken after review meeting)