मुंबई : येत्या रविवारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी वारंवार मराठा समाजातील नेत्यांकडून होत आहे. मात्र राज्य सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परीक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? असा प्रश्न राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट लिहित सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. (Udayanraje Bhosale On MPSC Exam)
“महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने 11 ऑक्टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परीक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये,” असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.
सरकारने आता मराठा समाजाची परिक्षा पाहू नये…
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्टोबरलाच परिक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. https://t.co/njMrpyAs75 pic.twitter.com/HiU3LYqoT6— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 9, 2020
“येत्या 11 तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच 15 हजार जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठी चिड निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे,” अशी टीका उदयनराजेंनी केली आहे.
‘जोपर्यंत मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारने परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय घेण्याचे धाडस करू नये. जेणेकरून सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घेता येतील. तसेच विद्यार्थ्यांची अशा परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वानाच संधी मिळेल अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळे कोणाचीही संधी हुकणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घोषित करावा.”
‘याशिवाय कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. तसेच परीक्षेसाठी पोषक असे वातावरण नसताना सरकार या परीक्षा कशासाठी घेत आहे.? परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार राहणार? त्यामुळे सरकारने या परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील,’ असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे. (Udayanraje Bhosale On MPSC Exam)
संबंधित बातम्या :
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक : विनायक मेटे
10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद स्थगित; मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मराठा नेत्यांंची घोषणा