न्यूयॉर्क : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने पुन्हा एकदा आडकाठी केली आहे. या प्रस्तावाला विरोध करण्याची चीनची ही चौथी वेळ आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनकडे वीटो (प्रस्ताव नाकारण्याची शक्ती) आहे. त्याचाच वापर करुन चीनकडून हा प्रस्ताव नेहमी ब्लॉक केला जातो.
सूत्रांच्या मते, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि मसूद अजहर यांचा आपापसात संबंध नाही, असं चीनचं म्हणणं आहे. याअगोदरही मसूदविरोधात पुरावे नव्हते, असा चीनचा दावा आहे. मसूद आणि जैश यांचा संबंध सिद्ध करणारे पुरावेही भारताने सादर केले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिलेल्या डोझिएरमध्ये या पुराव्यांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे जी-5 देश असंही याला म्हटलं जातं. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटेन आणि चीनचा समावेश आहे. फ्रान्सने मसूदविरोधात भारतासाठी हा प्रस्ताव आणला होता, ज्याला उर्वरित चारही देशांचा पाठिंबा होता. पण चीनने पाकिस्तानची बाजू घेत या प्रस्तावाला विरोध केला.
याअगोदरही चीनने भारताच्या प्रस्तावाचा विरोध केला होता. काही वेळा तांत्रिक बाबी दाखवल्या, तर यावेळी पुरावे मागितले. भारताच्या पुराव्यांची शहानिशा करण्याची गरज असल्याचं चीनने म्हटलंय. संपूर्ण जगाने पुलवामा हल्ल्याचा निषेध करत भारताच्या बाजूने उभं राहण्याचा निर्धार केला होता. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन, रशिया यांसारख्या महसत्ताही भारताच्या बाजूने होत्या. पण शेजारील देश चीनने पुन्हा एकदा आडमुठी भूमिका घेतली.
संसदेवरील हल्ला, पठाणकोट हल्ला, उरी हल्ला, पुलवामा हल्ला असे अनेक हल्ले जैश ए मोहम्मदने घडवून आणले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या भूमिकेवर तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. शिवाय ज्या चार देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं, त्यांचे भारताने आभारही मानले.