बीजिंग : जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना व्हायरस’चा उगम चीनमधील ज्या वुहानमधून सुरु झाला, तिथल्या रुग्णालयात आता एकही ‘कोरोना’ग्रस्त राहिलेला नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी रविवारी वुहानमधील सर्व ‘कोरोना’ग्रस्त ठणठणीत झाल्याचा दावा केला आहे. (China claims all COVID-19 Corona Virus Patients in Wuhan discharged)
’26 एप्रिलपर्यंत वुहानमधील कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. वुहान आणि देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही आनंददायी बातमी मिळाली’ अशी घोषणा मी फेंग यांनी केली.
कोरोना व्हायरसचा उगम वुहान शहरातील पशु बाजारपेठेत झाला, असा कयास आहे. जगात सर्वदूर पसरण्याआधी डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण इथे सापडला होता.
76 दिवसांच्या लॉकडाऊननंतर 8 एप्रिल रोजी वुहानमधील व्यवहार पुन्हा सुरु झाले होते. इथे एकूण 46 हजार 452 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या चीनमधील एकूण रुग्णांच्या 56 टक्के इतकी आहे. एकूण 3 हजार 869 वुहानवासियांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले. हे प्रमाण चीनमध्ये गेलेल्या एकूण ‘कोरोना’बळींच्या 84 टक्के आहे.
23 जानेवारीला हुबेई प्रांत आणि पर्यायाने राजधानी वुहान लॉकडाऊन करण्यात आले होते. रस्ते बंद, ट्रेन आणि विमाने रद्द करण्यात आली. रहिवाशांना जवळपास अडीच महिने मोकळेपणाने बाहेर फिरता आले नाही. हे निर्बंध शिथिल करुनही शहर नियमितपणे रहिवाशांची ‘कोरोना’ चाचणी घेत आहे.
हेही वाचा : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन कसा महत्त्वाचा ठरणार?
सध्या हेलॉंगजियांगच्या (Heilongjiang) या ईशान्य सीमेवरील प्रांतावर चीनने लक्ष केंद्रित केले आहे. तिथे रशियामधून आलेल्या ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आहे. चीनच्या आरोग्य प्राधिकरणाने 25 एप्रिल रोजी 11 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण नोंदवले होते, मात्र एकाही मृत्यूची नोंद नाही
Great News! All #COVID19 patients have been discharged from hospitals of #Wuhan, the epicenter of #China, as of Apr.26 according to the Natl Health Commission. Next step for #Wuhan is to prevent domestic & imported infections & resume medical treatment order. Congratulations! pic.twitter.com/UM5BuM3dCO
— Ambassador Deng Xijun (@China2ASEAN) April 26, 2020