नवी दिल्ली : भारत-चीन प्रत्यक्ष सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनला दणका दिला आहे. अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता चिनी कंपन्यांना भारताच्या कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी केले जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच चिनी कंपन्यांशी भागीदारी असलेल्यांनाही यापुढे थारा दिला जाणार नाही, असेही गडकरी म्हणाले. (Chinese companies to ban from highway projects In India)
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारतातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पात चिनी कंपन्यांना यापुढे सहभागी होता येणार नाही. तसेच या कंपन्यांना भारतीय कंपन्यांसोबत भागीदारीच्या माध्यमातून महामार्गाच्या प्रकल्पात रस्ते निर्मिती क्षेत्रात काम दिले जाणार नाही.”
“इतकंच नव्हे तर चिनी गुंतवणूकदारांना लघु, लघु आणि मध्यम उद्योगांपासून दूर ठेवण्यात येईल. त्यांना गुंतवणूक करण्यात रोखले जाईल. त्याशिवाय ज्या कंपन्या चीनसोबत भागीदारीत आहेत, त्या कंपन्यांनाही रस्ते बांधकामाबाबत कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. जर चिनी कंपन्यांनी भागीदार असलेल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या देशात येण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनाही परवानगी मिळणार नाही,” अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. (Chinese companies to ban from highway projects In India)
“लवकरच चीन कंपन्यांवर बंदी घालण्याबाबतचे नवे धोरणं आणलं जाणार आहे. यात भारतीय कंपन्यांसाठी पात्रता निकषमधील नियमांमध्ये शिथीलता दिली जाईल,” असेही ते म्हणाले.
“दरम्यान हा निर्णय केवळ नवीन प्रकल्पांवर लागू होईल. कारण सध्या सुरु असलेले अनेक प्रकल्प हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. त्यात चीनच्या अनेक कंपन्या सहभागी आहे,” असेही नितीन गडकरींनी सांगितले.
चीन अॅप्सवर बंदी
भारत-चीन सीमारेषा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अॅपचा या यादीत समावेश आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
भारतीय सार्वभौमत्व, संरक्षणाबद्दल, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.
अॅप बंदीचा चीनला कसा फटका?
⦁ चीनच्या 59 अॅपवर बंदी आल्यानं त्यांच्यापासून सर्वाधिक वेगानं वाढणारा बाजार दुरावणार
⦁ चीनपेक्षाही दुप्पट वेगानं वाढणारा ग्राहकवर्गापासून चिनी कंपन्या वंचित राहणार
⦁ चिनी कंपन्यांच्या उत्पन्नावर स्वाभाविकच दुष्परिणाम होणार
संबंधित बातम्या :
Chinese Apps Ban | Tik Tok, Share IT सह चीनच्या 59 अॅपवर बंदी, वाचा संपूर्ण यादी
Chinese Apps Ban | चीनच्या 59 अॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अॅप्सचं पुढे काय होणार?