चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी SIT नेमणार, पीडितेच्या भावाला संरक्षण

| Updated on: Aug 31, 2019 | 8:32 PM

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडितेच्या (Chunabhatti rape case) कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. शिवाय पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षणही दिलं जाणार आहे.

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी SIT नेमणार, पीडितेच्या भावाला संरक्षण
Follow us on

मुंबई : जालन्यातील तरुणीवर सामूहिक बलात्कार (Chunabhatti rape case) होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. तरीही आरोपी अद्याप मोकाट आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडितेच्या (Chunabhatti rape case) कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. शिवाय पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षणही दिलं जाणार आहे.

राज्य महिला आयोगाने यापूर्वी संबंधित प्रकरणाची स्वाधिकाराने दखल घेतली होती. पीडितेला न्याय देण्यासाठी आयोगाने काही आदेशही दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (क) (1) आणि (2) आणि कलम 10(2) अन्वये आयोगाने ही कार्यवाही केली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडितेचा भाऊ, त्यांचे अन्य नातेवाईक आणि सहकारी यांची भेट घेतली. विजया रहाटकर यांनी चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या कार्यालयात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलीस आयुक्त लख्मी गौतम, पोलीस उपायुक्त शशी मीना यांच्या उपस्थितीत पीडित कुटुंबाशी चर्चा करुन एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला.

पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास ‘सीबी-सीआयडी’कडे त्वरीत सोपविण्यात येईल. ‘सीबी-सीआयडी’कडून त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जाईल. याशिवाय पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही या बैठकीत ठरविण्यात आलं.

पोलीस आणि डॉक्टरांची चौकशी होणार

या घटनेचा प्राथमिक तपास करताना मुंबईच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याची दखल घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही विजया रहाटकर यांनी दिले. याशिवाय औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील डाक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही, हा आरोप लक्षात घेऊन संबंधित डाक्टरांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असंही विजया रहाटकर म्हणाल्या.

औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात तज्ज्ञ, निष्णात डाक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) करावे. हे शवविच्छेदन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोर अवलंब करावा. या शवविच्छेदनाला बंधू आणि त्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे, अशीही माहिती देण्यात आली. शिवाय पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

काय आहे प्रकरण?

जालना जिल्ह्यातील तरुणी मुंबईतील चेंबूरमध्ये तिच्या भावाकडे आलेली होती. 7 जुलै रोजी घरी कुणीही नसताना तिला बाहेर बोलावण्यात आलं आणि चार जणांकडून पाशवी बलात्कार करण्यात आला. या तरुणीला ड्रग्जही देण्यात आले होते. घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही. मात्र तिचा हात आणि पाय निकामी होत असल्याचं दिसताच तिला अर्धांगवायू समजून उपचार सुरु करण्यात आले. मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर तरुणीवर बलात्कार झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

यानंतर सर्व माहिती समोर येत गेली आणि औरंगाबादमध्ये सुरुवातीला गुन्हा नोंद करण्यात आला. मुंबईतील चुनाभट्टीमध्ये हा सर्व प्रकार घडला असल्याने संबंधित विभागाच्या पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. दीड महिन्यानंतरही एकही आरोपी हाती लागलेला नाही. शिवाय पोलिसांकडून आणि डॉक्टरांकडूनही अपमानास्पद वागणूक दिली गेली असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलाय.