नवी दिल्ली : डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत प्रवासी विमान सेवा 25 मे 2020 पासून पुन्हा सुरु करण्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केली. पुढील तीन महिन्यांच्या काळासाठी विमान प्रवासाची नियमावली पुरी यांनी जाहीर केली. विमानातील प्रत्येक वर्गासाठी कमाल आणि किमान तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत. ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून देशातील प्रवासी हवाई वाहतूक बंद आहे. (Civil Aviation Minister on Domestic flight operations)
प्रत्येक प्रवाशाला सोबत एकच चेक-इन बॅग नेण्याची मुभा दिली आहे. उड्डाणाच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर रिपोर्ट करणे बंधनकारक असेल, असे पुरी यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना मास्क घालणे आणि सॅनिटायझरच्या बाटल्या घेऊन जाणे अनिवार्य आहे.
विमानात जेवण दिले जाणार नाही, केबिन क्रू पूर्णपणे संरक्षक वेशात असेल. विमानात मधली सीट रिकामी ठेवली जाणार नाही. सीट रिकामी ठेवल्याने शारीरिक अंतराचे पालन होते, असे नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेनेच प्रवासी वाहतूक होणार. अन्यथा प्रवाशांना अधिक तिकीट दर सोसावा लागेल, असं हरदीपसिंह पुरी यावेळी म्हणाले.
प्रत्येक वर्गासाठी कमाल आणि किमान भाडे निश्चित करण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक व्यस्त मार्ग असलेल्या दिल्ली-मुंबई प्रवासाचे किमान भाडे 3 हजार 500 रुपये, तर कमाल भाडे 10 हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. दोन मेट्रो सिटी अंतर्गत वाहतूक 33 टक्के प्रमाणात सुरु होणार आहे.
हेही वाचा : नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, ‘या’ शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार
विमानतळावर कोणतेही फिजिकल चेक इन केले जाणार नाही, केवळ वेब चेक इनला परवानगी दिली जाणार आहे. आरोग्यसेतू अॅपवर प्रवाशांचे ‘कोविड स्टेटस’ तपासले जाईल. केवळ कोरोनाची लक्षण नसलेल्या प्रवाशांनाच विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं. (Civil Aviation Minister on Domestic flight operations)
While it was very important and essential to have lockdown, it is equally important to open up, considering the balance between lives and livelihoods; the time has now come for us to open up – Civil Aviation Minister @HardeepSPuri
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 21, 2020
40 मिनिटांपेक्षा कमी अवधीचे हवाईमार्ग, 40 ते 60 मिनिटे, 60 ते 90 मिनिटे, 90 ते 120 मिनिटे, 120 ते 150 मिनिटे, 150 ते 180 मिनिटे, 180 ते 210 मिनिटे अशा सात विभागात देशातील हवाई मार्गांची विभागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, वंदे भारत उपक्रमाअंतर्गत आम्ही परदेशात अडकलेल्या 20 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना परत आणले, अशी माहिती पुरी यांनी दिली. वंदे भारत मिशनचा जोर खरोखर अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्यांना परत आणणे, यावर आहे, परतण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला आणण्यावर नाही, असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही परदेशी रहिवासी असलेल्या नागरिकांनाही घेऊन जात आहोत. त्यांची संख्या भारतात आणलेल्या नागरिकांपेक्षा कमी आहे, कारण काही देश त्यांना परत येऊ देत नाहीत, असंही नागरी उड्डाण मंत्री म्हणाले. (Civil Aviation Minister on Domestic flight operations)