कोल्हापूर | 17 फेब्रुवारी 2024 : 2019 साली तुम्ही लग्न एकासोबत केलं. संसार दुसऱ्यासोबत आणि हनिमून तिसऱ्यासोबत… एकीकडे बाळासाहेब , दुसरीकडे मोदी यांचे फोटो लावून तुम्ही मतं मिळवलीत. पण सत्तेच्या मोहापायी तुम्ही सगळं गमावलं, सगळं गमावलं. अशा शब्दांत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.
महाराष्ट्राच्या जनतेला दोनदा फसवलं
तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला, मोदी साहेबांना, भाजपला एकदा नाही दोनदा फसवलंत. खुर्चीसाठी तुम्ही बेमानी केली. दुसऱ्यांदा तुमच्या कुटुंबातलं काहीतरी निघाल्यावर तुम्ही दिल्लीला गेलात. दिल्लीला जाऊन पुन्हा युती करू असा शब्द देऊन आलात. मोदी साहेबांची भेट घेतला त्यावेळी तुम्हाला घाम फुटला होता,असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला व मोदी साहेबांना दोन वेळा फसवलं आहे. मग तुम्ही आमच्यावर का आरोप करता ? तुम्ही आम्हाला बेईमान म्हणता, शिव्याशाप का देता असा सवाल त्यांनी विचारला. तुम्ही जेवढा आमच्यासाठी खड्डा खणाल, तेवढेच तुम्ही खड्ड्यात जाणार असेही ते म्हणाले.
बाळासाहेब कोणाची मक्तेदारी नाहीत
बाळासाहेब ही कुणाची मक्तेदारी नव्हती . बाळासाहेब हे आमचं दैवत होते. ते तुम्ही विकून टाकलं, सत्तेच्या मोहासाठी बाळासाहेबांची विचार सोडले, त्यांची भूमिका विकलीत, असा आरोप शिंदे यांनी केला.
(ठाकरे यांनी) आरसा स्वतः पहावा व स्वतःचं कर्तृत्व आरशात पहाव. किती मुकुटं घालून फिरणार तुम्ही, हे कधी लपत नाही. या गोष्टी सगळ्या बाहेर येत असतात. बाळासाहेबांचा वारसा नुसता तोंडात असून चालत नाही. त्यासाठी मनगटात जोर असावा लागतो व ताकत असावी लागते. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं ही शिवसेना कार्यकर्ते होते.शिवसेना अशीच मोठी झाली नाही. त्यासाठी रक्ताचे पाणी केले लोकांनी. घरावर तुळशीपत्र ठेवले.
तुमच्यावर आलेली संकटं मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेस बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेन. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होती, तिथे आता रडण्याचा आवाज येतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तुम्हाला आयत्या पिठावर रांगोळी काही नीट मारता आले नाही. असा कुठे पक्षप्रमुख असतो का ? पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे तरचं पक्ष मोठा होतो. असाच पक्ष मोठा होत नाही. दोन-चार टाकल्याने घेऊन पक्ष वाढत नाही. असे तीन-चार एकनाथ शिंदे पाहिजे भागाभागांमध्ये तयार केले पाहिजेत. असा पक्षप्रमुख असतो का, कार्कर्त्यांचा, नेत्यांचा पाणउतारा करणारा ? मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवूनच काम तुम्ही केलं, त्यांचं घर जाळण्याचं काम तुम्ही केलं, असं सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला चढवला.