मुंबई : सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा करण्याची शक्यता आहे. कोकणातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधू शकतात. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दसऱ्यानंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (CM Uddhav Thackeray May Visit Konkan Region after Dussehra)
परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. तर आज (बुधवार, 21 ऑक्टोबर) ते उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
दसऱ्यानंतर मुख्यमंत्री कोकण दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्याची रुपरेषा सध्या आखली जात आहे. “मी कोकणात येणार आहे, दसऱ्यानंतर येईन” असे उद्धव ठाकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची चर्चा करताना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्याची पाहणी करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान येत्या 24 ऑक्टोबरला मुख्यमंत्री कोकण दौरा करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
उद्धव ठाकरेंनी सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदतीचे चेक दिले होते. मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरघोस मदत द्या, अशी मागणी बळीराजा करत आहे.
अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. (CM Uddhav Thackeray May Visit Konkan Region after Dussehra)
संबंधित बातम्या :