बुलडाणा : मलकापूर तालुक्यातील नळगंगा आणि पुर्णा नदीपात्रातून अवैध्यरीत्या रेतीचे उत्खनन करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी 800 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे. अवैध रेती साठा करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 2 कोटी 56 लाखांची जप्ती करण्यात आली आहे.
मलकापूर तालुक्यात नळगंगा आणि पुर्णा नदीपात्रातून जेसीबीच्या साहाय्याने वाळूचे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने मोठ्या प्रामाणात वाहतूक सुरु होती. या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. ही अवैध रेती शहरातील शासकीय-निमशासकीय जागेवर जमा केली जात होती. या अवैध रेतीसाठ्यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात होता. जिल्हाधिकारी यांच्या पथकाने मलकापूर शहरातील या अवैध रेती साठ्यावर धाड टाकून सुमारे 800 ब्रास रेती साठा जप्त केला.
जालन्यातही अवैध रेती माफियांसह अधिकाऱ्यांवर कारवाई
अवैध रेतीसाठा प्रकरणी जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जालना येथे गोदावरी नदी पात्रातून हजारो ब्रास रेती चोरी करुन शासनाचा महसूल बुडवला जात होता.
यामध्ये विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकारी शशिकांत हातगल, अंबड तहसीलदार मनीषा मैने, घनसावंगी तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस निरीक्षक शशिकांत देवकर, जिल्हा गोंण खनिज अधिकारी तुषार निकम, नायब तहसीलदार वंदना शडुलकर, वाय.ऐन. दांडगे, बी.के.चंडोल, संदीप मोरे, मंडळ अधिकारी डिंगबर कुरेवाड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या चोकशीचे आदेश दिले आहेत.
मलकापूर आणि जालना येथील रेती माफियांवर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.