मनसेचे ‘बांगलादेशी’ भारतीय निघाले, पीडितांची मनसैनिकांविरोधात पोलीस तक्रार

| Updated on: Feb 23, 2020 | 9:11 PM

पुण्यात पकडण्यात आलेले संशयित बांगलादेशी नसून भारतीयच असल्याचं उघड झालं आहे.

मनसेचे ‘बांगलादेशी’ भारतीय निघाले, पीडितांची मनसैनिकांविरोधात पोलीस तक्रार
Follow us on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपाठोपाठ पुण्यातही काही संशयितांना पकडून बांगलादेशी असल्याचा दावा केला. मात्र, पुण्यात पकडण्यात आलेले संशयित बांगलादेशी नसून भारतीयच असल्याचं उघड झालं आहे (MNS campaign about Bangladeshi  Intruder). पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाने मनसेच्या दाव्यातील हवा काढली आहे. यानंतर आता पीडित कुटुंबाने देखील झालेल्या मनस्तापाविरोधात कायदेशी लढाईची तयारी केली आहे. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वात काही संशयितांना पकडले. मात्र, आता ते लोक बांगलादेशी नसून उत्तर प्रदेश आणि कोलकाताचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संबंधितांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागल्याने त्यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून पीडितांनी राज ठाकरे आणि पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.


मनसेने संशयित म्हणून पकडलेल्या तिन्ही पीडितांनी स्वारगेट पोलीस विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत मोर्चाही काढण्यात आला. यावेळी मनसेनं घुसखोरांना देशातून बाहेर काढावं, अशी जोरदार मागणी केली. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी घुसखोरांना शोधण्याची मोहिम सुरु केली. मुंबईत काही संशयित घुसखोर पकडल्यानंतर पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीन जणांना बांगलादेशी घुसखोर असल्याचं म्हणत पकडलं. त्यांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

पोलिसांनी संशयित तिघांचीही चौकशी केली. त्यात तिघेही भारतीयच असल्याचं सिद्ध झालं. यानंतर पीडितांपैकी एकाने मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी घरात घुसून बाहेर काढलं. त्याचबरोबर आपल्याला बांगलादेशी संबोधल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

MNS campaign about Bangladeshi  Intruder